आरोग्य अभियानातील कामांची त्रयस्थ यंत्रणेमार्फत चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:10 AM2021-06-27T04:10:21+5:302021-06-27T04:10:21+5:30
अमरावती : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातील कामांबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या आहेत. या सर्व तक्रारीचे त्रयस्थ यंत्रणेकडून चौकशी ...
अमरावती : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातील कामांबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या आहेत. या सर्व तक्रारीचे त्रयस्थ यंत्रणेकडून चौकशी व्हावी व जबाबदारांवर कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी शनिवारी प्रशासनाला दिले.
अभियानातील विविध कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी आमदार बळवंत वानखडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप, जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर, जयंत देशमुख, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, सीईओ अविश्यांत पंडा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, डॉ. रेवती साबळे आदी उपस्थित होते.
याशिवाय गरीब, वंचित तसेच गरजू ग्रामीण नागरिकांना सहजसाध्य, परवडण्याजोगी, कार्यक्षम, उत्तरदायीत्व आणि विश्वासार्ह आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात अनेक कार्यक्रम राबविले जातात. तथापि, जिल्हा यंत्रणेकडून त्यांची चांगली अंमलबजावणी होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. यावर योग्य प्रकारे अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत.
बॉक़्स
तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर यंत्रणा सज्ज ठेवा
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता संपूर्ण यंत्रणा सुसज्ज ठेवण्याचे निर्देशही आरोग्य विभागाला पालकमंत्र्यांनी दिले आहेत. बृहद आराखड्यात पूर्ण झालेल्या उपकेंद्रांसाठी मनुष्यबळ उपलब्ध करून घ्यावे. आवश्यक तिथे कंत्राटी तत्त्वावर नेमणुका कराव्यात; पण आरोग्य सेवेत खंड पडू नये. नांदगावपेठ व खोलापूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. तेथील लोकसंख्या पाहता तिथे ग्रामीण रुग्णालय होणे आवश्यक आहे. त्यानुसार कार्यवाही व्हावी, असे निर्देश त्यांनी दिले.