सोयाबीनवर खोड किडीचा 'अटॅक'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 05:00 AM2020-08-24T05:00:00+5:302020-08-24T05:01:07+5:30
सोयाबीन पिकावर शेतकऱ्यांची वर्षभराची उलाढाल अवलंबून असते. त्यामुळे पीकपेरणी, मशागतीकरिता शेतकरी कर्जबाजारी होऊनही पिकावर पाण्यासारखा पैसा खर्च करतो. महागडे बियाणे, फवारणी यावर सर्वात अधिक खर्च केला जातो. मात्र यावर्षी सोयाबीन पिकाने शेतकऱ्यांना चांगलाच दगा दिला आहे. यावर्षी सर्वप्रथम सोयाबीनच्या बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यामध्ये पेरलेले बियाणे उगवलेच नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर बाजार : तालुक्यातील सोयाबीन पिकावर 'येलो मोझॅक' रोगाने अटॅक केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक उद्ध्वस्त झाले आहे. पिकांचे नुकसान झाल्याची माहिती मिळताच राज्यमंत्री बच्चू कडू हे थेट बांधावर पोहोचले. यावेळी त्यांनी कृषी विभागाच्या कार्यप्रणालीवर संताप व्यक्त केला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनाम्याचे आदेश देण्यात आले आहे.
सोयाबीन पिकावर शेतकऱ्यांची वर्षभराची उलाढाल अवलंबून असते. त्यामुळे पीकपेरणी, मशागतीकरिता शेतकरी कर्जबाजारी होऊनही पिकावर पाण्यासारखा पैसा खर्च करतो. महागडे बियाणे, फवारणी यावर सर्वात अधिक खर्च केला जातो. मात्र यावर्षी सोयाबीन पिकाने शेतकऱ्यांना चांगलाच दगा दिला आहे. यावर्षी सर्वप्रथम सोयाबीनच्या बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यामध्ये पेरलेले बियाणे उगवलेच नाही. काही बियाणे उगवले असले तरी येलो मोझॅकसारख्या विविध रोगामुळे फटका बसला आहे. कुरळपूर्णा भागातील एका शेतात चक्क सोयाबीन पीक बकºयाच्या चाऱ्यासाठी खुले केले आहे. याची गंभीर दखल घेत पं.स.सदस्य संतोष किटुकले यांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांना माहिती दिली. यावेळी दौऱ्यावर असलेले राज्यमंत्री बच्चू कडू थेट कुरळपूर्णा येथील शेतकरी वैभव धाकडे यांच्या शेतात पिकाची पाहणी करण्यासाठी पोहोचले. त्यांनी तालुका कृषी अधिकारी अंकुश जोगदंड यांना माहिती विचारली. समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांचाच समाचार घेतला. जिल्हा कृषी अधीक्षकांना पीकपाहणीचे आदेश दिले. यावेळी मंडळ कृषी अधिकारी दांडेगावकर, तहसीलदार अभिजित जगताप व शेतकरी उपस्थित होते.
यंदा पहिल्यांदा पेरलेले सोयाबीन उगवले नाही. जे उगवले ते हातात येण्यापूर्वी खराब झाल्यामुळे राज्यातील कृषी विभागावर शंका व्यक्त होत आहे. यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करून विम्याचा लाभ देण्यात येणार आहे. विमा नसलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मदत दिली जाईल.
- बच्चू कडू, राज्यमंत्री, महराष्ट्र शासन
कारवाईचे आदेश
महाबीजने बाजारातील २ ते ३ हजार रुपये क्विंटलचे निकृष्ट दर्जाचे सोयाबीन खरेदी करून शेतकºयांना ८ हजार रुपये प्रतिक्विंटलने विकले आहे. त्यामुळे या सर्व प्रकारची चौकशी करून दोषींवर कार्यवाही केली जाणार असल्याचे आश्वासन दिले.