स्वंयघोषित सर्पमित्रच असुरक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 01:39 AM2019-08-13T01:39:18+5:302019-08-13T01:41:29+5:30
स्वयंघोषित सर्पमित्र जाणतेपणाने स्वत:चा जीव धोक्यात घालत साप पकडण्याचा प्रयत्न करी आहे. मात्र, नुकत्याच घटलेल्या काही घटनांमध्ये स्वयंघोषित सर्पमित्रांनाच सर्पदंश झाला आहे. त्यामुळे स्वयंघोषित सर्पमित्रांवर अंकुश ठेवण्यात वनविभागाही अपयशी ठरला आहे.
वैभव बाबरेकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :स्वयंघोषित सर्पमित्र जाणतेपणाने स्वत:चा जीव धोक्यात घालत साप पकडण्याचा प्रयत्न करी आहे. मात्र, नुकत्याच घटलेल्या काही घटनांमध्ये स्वयंघोषित सर्पमित्रांनाच सर्पदंश झाला आहे. त्यामुळे स्वयंघोषित सर्पमित्रांवर अंकुश ठेवण्यात वनविभागाही अपयशी ठरला आहे. वनविभागाच्या दुर्लक्षामुळे या स्वयंघोषित सर्पमित्रच आता असुरक्षित असल्याचे दिसून येत आहे.
वनविभागाकडून काही वर्षांपूर्वी सर्पमित्रांची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्यांना ओळखपत्र वाटप करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर सर्पमित्रांची नोंदणी प्रक्रिया थंडबस्त्यात राहिली. आता पुन्हा अनधिकृत सर्पमित्रांचा सुळसुळाट जिल्हाभरात पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून अमरावती जिल्ह्यात स्वंयघोषित सर्पमित्रांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येत आहे. साप पकडण्याच्या धाडसी कामाचे प्रदर्शन दाखविण्यात अनेक स्वंयघोषित सर्पमित्र फुशारक्या मारत फिरताना आढळतात. गल्लो-गल्लीत सर्पमित्र तयार झाल्याचे दिसून येत आहे. कुठल्याही सापाची माहिती नसताना त्याला चुकीच्या पद्धतीने पकडण्याचा प्रयत्न करतात. साप पकडताना लोखंडी सळाख, आरीचे पाते, लाकूड यासारख्या वस्तूंचा वापर करणारे हे 'स्वयंघोषित सर्पमित्र' सापांचा जीव वाचवितात की, त्याला इजा पोहोचवितात, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच समाजात आपण शौर्य असल्याची खोटी प्रतिमा तयार करण्याच्या प्रयत्नात ते स्वत:चाच जीन धोक्यात टाकत आहेत. योग्य प्रशिक्षण नाही, स्थानिक सापाची योग्य माहिती नाही, त्यामुळे बरेचदा स्वंयघोषित सर्पमित्रांना सर्पदंश झाल्याच्या घटना निदर्शनात येत आहेत. गेल्या दोन महिन्यांत स्वयघोषित ४ सर्पमित्रांना सर्पदंश झालेला आहे. सुदैवाने साप विषारी असतानाही प्राणहानी झाली नाही. या स्वंयघोषित सर्पमित्रांमुळे खऱ्या सर्पमित्रांच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे. स्वयंघोषित सर्पमित्र साप पकडल्यानंतर त्याच्याशी खेळतात, सार्वजनिक ठिकाणी बॉटलीत बंद असलेल्या सापाला नेऊन प्रदर्शनच मांडतात. साप पकल्याचे व्हिडीओ काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करतात. अशा काही सर्पमित्रांवर वनविभागाकडून कारवाई करण्यात आली नाही. मात्र, तरीसुद्धा या स्वयंघोषित सर्पमित्रांवर अद्याप अंकुश लागलेले नाही. त्यामुळे आता स्वयंघोषित सर्पमित्रांच्याच जिवाला धोका निर्माण झाल्याने ते असुरक्षित आहेत.
विष विक्रीचीही शक्यता
स्वयंघोषित सर्पमित्र साप पकडून त्याचा दुरुपयोग व प्रदर्शन करीत असल्याची बाब जगजाहीर आहे. मात्र, विषारी सापांना पकडून त्यांचे विष काढून ते विक्री करीत असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे वनविभागाने अशा सर्पमित्रांवर अंकुश ठेवणे आता गरजेचे झाले आहे.
दोन महिन्यात ७८ जणांना सर्पदंश
जून-जुलै या दोन महिन्यांत इर्विन रुग्णालयात सर्पदंश झालेल्या अवस्थेत ७८ रुग्णांना दाखल करण्यात आले. एका महिलेचा मृत्यू झाला. सर्पदंश झालेल्या अवस्थेत दोन ते तीन सर्पमित्रांनाही दाखल करण्यात आले आहे. एक सर्पमित्र तर चक्क चावा घेतलेल्या सापालाच घेऊन थेट इर्विन रुग्णालयात पोहोचला होता.
या सर्पमित्रांशी सपर्क करा
अमरावती शहरातील वसा संस्थेतील सर्पमित्र प्रशिक्षीत आहेत, कठोरा नाका, नवसारी परिसरासाठी निखिल फुटाणे, वडाळी आणि पाचशे क्वॉर्टर परिसरासाठी भूषण हंगरे, पंचवटी- राहटगाव- नांदगाव पेठसाठी मुकेश वाघमारे, बडनेरा ग्रामीणसाठी भूषण सायंके, भाजी बाजारसाठी अवि येते, महादेव खोरी, दस्तुर नगरासाठी तुषार इंगोले, अभिजित दाणी, पूर्ण अमरावती शहराकरिता गणेश अकर्ते यांचा सहभाग आहे.