दिशाभूल करून कॅश चोरणारा अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 10:48 PM2019-07-02T22:48:45+5:302019-07-02T22:49:08+5:30
खरेदीच्या बहाण्याने व्यापारी प्रतिष्ठानात जाऊन काऊंटरवरील रोख लंपास करणारा कुख्यात चोर कपिल भाटी याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी सकाळी अटक केली. आरोपी कपिल भाटीने एका अल्पवयीन साथीदाराच्या मदतीने खोलापुरी गेट व फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : खरेदीच्या बहाण्याने व्यापारी प्रतिष्ठानात जाऊन काऊंटरवरील रोख लंपास करणारा कुख्यात चोर कपिल भाटी याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी सकाळी अटक केली. आरोपी कपिल भाटीने एका अल्पवयीन साथीदाराच्या मदतीने खोलापुरी गेट व फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली.
सराफा बाजार परिसरातील निर्मला अशोक सोनी यांच्या आइस्क्रीम पार्लरमधून २८ जून रोजी अज्ञात चोरांनी २१ हजारांची रोख लंपास केली. एका दुचाकीवर आलेल्या दोघांनी आइस्क्रीम मागण्याच्या बहाण्याने गल्ल्यातून रोख चोरून नेली होती. ३० जून रोजी या घटनेच्या तक्रारीवरून खोलापुरी गेट पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविला. या तक्रारीच्या अनुषंगाने खोलापुरी गेट व गुन्हे शाखेच्या पोलिसांनी समांतर तपास सुरू केला. गोपनीय माहितीवरून या गुन्ह्यात कपिल भाटी व त्याच्या अल्पवयीन साथीदाराचा समावेश असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक कैलास पुंडकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक आशिष देशमुख, पोलीस कर्मचारी प्रकाश जगताप, विजय पेठे, विनय मोहोड, पवन घोम, सय्यद इमरान व गजानन सातंगे यांनी कपिलला ताब्यात घेतले. त्याच्या माहितीवरून पोलिसांनी त्याचा अल्पवयीन साथीदारालाही ताब्यात घेतले.
दोघांच्या चौकशीदरम्यान आरोपींनीे सराफा बाजार व फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील यशोदानगर येथील एका साडी सेंटरमध्ये चोरी केल्याची कबुली दिली. पुढील चौकशीसाठी कपिल भाटीला खोलापुरी गेट पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
कपिल भाटीवर पाच गुन्हे
आरोपी कपील भाटीविरुद्ध यापूर्वी विविध ठाण्यांत पाच गुन्हे दाखल आहेत. व्यापारी प्रतिष्ठानात जाऊन, त्यांची दिशाभूल करून काऊंटर व गल्ल्यातील रोख लंपास करण्याची पद्धत कपिल भाटीची आहे. चोरी केलेल्या पैशांतून तो मौजमस्ती करीत असल्याचे आढळून आले आहे.