खरपी, रवाळा नाक्यावर ‘जीएसटी’ पथकाद्वारे तपासणी; आंतरराज्य सीमेवर करडी नजर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2024 03:07 PM2024-03-31T15:07:15+5:302024-03-31T15:07:29+5:30
१६ अधिकारी, ४० कर्मचाऱ्यांचे पथक तैनात लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ही कारवाई राज्य कर जीएसटी विभागाद्वारे होत आहे.
अमरावती : महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या खरपी व रवाळा या आंतरराज्य सीमेवर राज्य कर (जीएसटी) अधिकाऱ्यांद्वारे वाहनांची तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. या पथकाला पोलिस, राज्य उत्पादन शुल्क व आयकर विभागाने सहकार्य मिळत आहे. या विभागाचे १६ अधिकारी व ४० कर्मचाऱ्यांचे पथक तयार करण्यात आलेले आहे व या पथकाद्वारे ही तपासणी होत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ही कारवाई राज्य कर जीएसटी विभागाद्वारे होत आहे. यामध्ये चांदूरबाजार तालुक्यात खरपी व वरुड तालुक्यातील रवाळा या दोन आंतरराज्य सीमेवरील नाक्यावर या पथकाद्वारे वाहन तपासणी सुरू करण्यात आली आहे. या पथकाद्वारे आतापर्यंत २०० वाहनांची तपासणी करण्यात आली आहे.
मार्च महिना व शासनाला अधिक महसूल देणारा हा विभाग असल्याने वसुलीच्या कामासोबतच निवडणुकीची कामे या विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांद्वारे होत आहेत. यासाठी जीएसटी राज्य विभागाचे जिल्हा समन्वयक म्हणून उज्ज्वल देशमुख यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. बाहेरच्या राज्यातून होणाऱ्या मालाच्या वाहतुकीवर या पथकाची करडी नजर आहे. रोख रक्कम, दारू याची अवैध वाहतूक रोखण्यासाठी या पथकाला, पोलिस, राज्य उत्पादन शुल्क, आयकर आदी विभागांचे सहकार्य मिळत असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
तफावत आढळल्यास २०० टक्क्यांपर्यंत दंड
मालाची वाहतूक करताना वस्तू व सेवा कर कायद्याचे कलम ६८ व नियम १३८ नुसार आवश्यक असणारे योग्य इनव्हाइस व ई-वे बिल आहे किंवा नाही याची तपासणी या विभागाचे मोबाइल ॲपद्वारे ऑनलाइन पद्धतीने करण्यात येत आहे. मालाची किंमत, वजन, संख्या टॅक्स इनव्हाइस व वाहनातील माल यात तफावत किंवा त्रुटी आढळल्यास नियम १२९ नुसार कराच्या २०० टक्क्यांपर्यंत दंड लावण्याची कठोर कारवाई या विभागाद्वारे होत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाहेरच्या राज्यातून होणारी मालाची वाहतूक, रोख रक्कम, दारू आदीबाबत आंतरराज्य सीमेवर पथकांद्वारे वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. १६ अधिकारी व ४० कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या पथकाचा वॉच आहे.
संजय पोखरकर
राज्य कर सहआयुक्त, अमरावती विभाग