इर्विनमध्ये ‘ईएनटी’ विभागात तपासणी यंत्रे नादुरुस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:13 AM2021-01-21T04:13:25+5:302021-01-21T04:13:25+5:30
अमरावती : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नाक, कान, घसा (ईएनटी) विभागातील यंत्रे नादुरुस्त असल्याने रुग्णांची दैना होत आहे. अधिकारी, ...
अमरावती : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नाक, कान, घसा (ईएनटी) विभागातील यंत्रे नादुरुस्त असल्याने रुग्णांची दैना होत आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांची वानवा असताना यंत्रेदेखील निकामी असल्यामुळे हा विभागही बहिरा झाला आहे.
धारणी तालुक्यातील काल्पी येथील रहिवासी सुरेश रामलाल पवार हे बुधवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास इर्विनमध्ये ईएनटी विभागात कान तपासणीकरिता आले होते. ऑनलाईन नोंदणी केली होती. मात्र, तपासणीसाठी ईएनटी विभागात गेले असता तपासणी यंत्रे नादुरुस्त असल्याचे सांगण्यात आले. कानाने ऐकू येत नसल्याने मोठ्या आशेने इर्विन रुग्णालय गाठले. मेळघाट सेल विभागातील परिचारिका ईमला मावस्कर यांनीदेखील तपासणी यंत्रे नादुरुस्त असल्याची माहिती सुरेश पवार यांना दिली. तपासणी यंत्रे कधी दुरुस्त होतील, याचे काही सांगता येणार नाही, असे परिचारिका म्हणाल्या. याबाबत आमदार सुलभा खोडके यांच्यासह जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांना तक्रार देण्यात आली.