पालकमंत्र्यांकडून अतिवृष्टिग्रस्त भागांची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 05:00 AM2021-07-23T05:00:00+5:302021-07-23T05:01:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : अतिवृष्टीमुळे घरांची व शेतीची मोठी हानी झाली. प्रशासनाने नुकसानग्रस्तांना भरपाई मिळण्यासाठी तात्काळ कार्यवाही करावी. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अतिवृष्टीमुळे घरांची व शेतीची मोठी हानी झाली. प्रशासनाने नुकसानग्रस्तांना भरपाई मिळण्यासाठी तात्काळ कार्यवाही करावी. आपद्ग्रस्तांना शक्य ती सर्व मदत मिळवून देऊ, असे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगितले.
पालकमंत्री ठाकूर यांनी गुरुवारी खारतळेगाव, रामा, साऊर, टाकरखेडा संभू आदी अतिवृष्टिग्रस्त भागाची पाहणी केली. ग्रामीण नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
पालकमंत्र्यांनी यावेळी खारतळेगाव येथील अतिवृष्टीने आलेल्या पुरात वाहून गेलेल्या युवकांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व त्यांना तात्काळ मदत, सानुग्रह अनुदान मिळण्यासाठी कार्यवाहीचे निर्देश दिले. उपविभागीय अधिकारी नरेंद्र फुलझेले, तहसीलदार नीता लबडे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती जयंतराव देशमुख, हरिभाऊ मोहोड यांच्यासह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
शासन पूरग्रस्तांच्या खंबीरपणे पाठीशी
खारतळेगाव येथील पुरात प्रवीण गुडधे, निरंजन गुडधे हे युवक वाहून गेले. या दोहोंच्या कुटुंबीयांची भेट घेऊन पालकमंत्र्यांनी त्यांची व्यथा जाणून घेतली व सांत्वन केले. आपण स्वत: एक कुटुंबीय म्हणून या कुटुंबाच्या कायम पाठीशी राहू. या कुटुंबांना शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळवून देण्यात येईल, अशा शब्दांमध्ये पालकमंत्र्यांनी दिलासा दिला. यावेळी पालकमंत्र्यांकडूनही १० हजार रुपयांची तातडीची मदत करण्यात आली.
भरपाईसाठी सविस्तर प्रस्ताव पाठवा
अतिवृष्टीने रामा येथे भिंतीची पडझड तसेच धान्य, कडबा यांचे नुकसान झाले. साऊर येथेही अतिवृष्टीने नुकसान झाले. या गावांतील घरांच्या पडझडीबाबत पंचनामे करण्यात आले. शेतीच्या नुकसानाचेही परिपू्र्ण व सविस्तर पंचनामे करावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
रेणुका नाल्याचे खोलीकरण आवश्यक
टाकरखेडा संभू येथील रेणुका नाला व इतर परिसराची पालकमंत्र्यांनी पाहणी केली. काही वर्षांपूर्वी त्यांच्या प्रयत्नाने नाला खोलीकरणाचे काम झाले होते. त्यामुळे पूरहानीचे प्रमाण कमी झाले होते. पुन्हा नाला खोलीकरण करण्यात मदत देऊ, असे पालकमंत्री म्हणाल्या.
पूरसंरक्षणासाठी उपाययोजना
पूरसंरक्षण भिंत, नाला खोलीकरण, चांगले पांदण रस्ते आदी विविध कामे हाती घेण्यात येतील. अशा कामांसाठी आवश्यक निधी मिळवून देऊ, असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. एकही पात्र व्यक्ती भरपाईपासून वंचित राहू नये, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.