उड्डाणपुलाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2017 12:06 AM2017-05-14T00:06:26+5:302017-05-14T00:06:26+5:30
आ.रवि राणा यांनी शनिवारी आयुक्तांसमवेत राजापेठ उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी केली.
रवि राणा यांची उपस्थिती : महापालिकेला निर्देश
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : आ.रवि राणा यांनी शनिवारी आयुक्तांसमवेत राजापेठ उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी केली. तथा या कामाचा पहिला टप्पा जुलै व दुसरा टप्पा पाच महिन्यात सुरू करावा, अशा सूचना त्यांनी महापालिका प्रशासनाला दिल्यात. जनतेला त्रास झाल्यास संबंधित कंत्राटदारावर १० टक्के दंड लावण्याच्या सूचना राणा यांनी महापालिका आयुक्त हेमंत पवार यांच्यासह महापालिका प्रशासनाला दिल्या.
आपण राज्यसरकारकडे प्राधान्याने पाठपुरावा केल्याने या योजनेचा ४० कोटी रुपये किमतीचा डीपीआरला मान्यता मिळून १४ कोटी रुपये उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी उपलब्ध करून दिल्याची माहिती आ.राणा यांनी यावेळी दिली. निधीची उपलब्धता झाल्याने आता दहापट वेगाने काम करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्यात. नगरविकास विभागाने ११ मे रोजी राजापेठ उड्डाणपूल प्रकल्पाला महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानाअंतर्गत ३४.९२ कोटींच्या खर्चास प्रशासकीय मान्यता दिली आहे. या कामाच्या पाहणीवेळी आयुक्त हेमंत पवार यांच्यासह या विवक्षित कामाची जबाबदारी असलेले अभियंता जीवन सदार, उड्डाणपुलाचे कंत्राटदार चाफेकर, महापालिकेचे कार्यकारी अभियंता अनंत पोतदार आणि युवा स्वाभिमान संघटनेचे शहराध्य्यक्ष संजय हिंगासपुरे, अजय मोरय्या, संदीप गुल्हाने, सचिन भेंडे, पदाधिकारी उपस्थित होते.