फिरत्या प्रयोगशाळेद्वारे बांधावर खते, कीटकनाशकांची तपासणी - ना. अब्दुल सत्तार
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: April 28, 2023 05:57 PM2023-04-28T17:57:47+5:302023-04-28T17:58:56+5:30
खरीप नियोजन आढावा सभेत यंत्रणेला निर्देश
अमरावती : खते, बियाण्यांच्या उपलब्धतेबाबत दक्ष राहून पुरवठा होईल याची काळजी घ्यावी. शेतकऱ्यांची अडवणूक, फसवणूक होऊ नये यासाठी फिरत्या प्रयोगशाळांद्वारे खते, कीटकनाशके यांची तपासणी करा, अनधिकृत व बोगस बियाणे, खतांच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कडक कार्यवाही करण्याचे निर्देश कृषीमंत्री अब्दूल सत्तार यांनी दिले.
विभागातील खरीप नियोजनाचा आढावा कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नियोजनभवनात घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. खा. डॉ. अनिल बोंडे, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, प्र. विभागीय आयुक्त षण्मुगराजन एस., संचालक (नियोजन) सुभाष नागरे, फलोत्पादन संचालक कैलास मोते, संचालक (विस्तार) दिलीप झेंडे, संचालक (गुणनियंत्रण) विकास पाटील, ‘आत्मा’ संचालक दशरथ तांबाडे, मृद व संधारण संचालक रवींद्र भोसले, विभागीय कृषी सहसंचालक किसनराव मुळे, तसेच सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी उपस्थित होते.
स्मार्ट प्रकल्पात अकोला, अमरावती अव्वल
‘स्मार्ट’ प्रकल्पात विभागातील ६४ सविस्तर प्रकल्प अहवाल राज्याकडून मंजूर आहेत. यामध्ये संत्रा, क्लिनिंग ग्रेडिंग, कॉटन जिनींग, प्रेसिंग युनिट, बियाणे प्रक्रिया, डाळ मिल, फळे भाजीपाला प्रक्रियाद्वारे चालना मिळणार आहे. या प्रकल्पात राज्यात अकोला जिल्हा प्रथम व अमरावती दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे कृषी विभागाने सांगितले.