विभागीय आयुक्तालयाच्या पथकांकडून झेडपीत कामकाजाची तपासणी
By जितेंद्र दखने | Published: January 17, 2024 05:32 PM2024-01-17T17:32:46+5:302024-01-17T17:33:06+5:30
१५ ते २५ जानेवारीपर्यंत विभागनिहाय दस्तऐवजाची पडताळणी.
जितेंद्र दखने,अमरावती : गत मंगळवार ९ जानेवारीला तपासणी केल्यानंतर १५ जानेवारीपासून जिल्हा परिषदेत विभागीय तपासणी चमू दाखल झाली आहे. या तपासणी पथकाकडून ९ विभागांमार्फत केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची वास्तविकता जाणून घेण्याचा प्रयत्न या तपासणी दरम्यान केला जातो. योजनांची लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेली माहिती व अन्य प्रशासकीय कामकाजाची पडताळणी केली जात आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची वास्तविकता जाणून घेण्याचा प्रयत्न या तपासणीदरम्यान केला जातो. त्याचाच एक भाग म्हणून शासकीय योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेली माहिती, त्यानुसार त्या योजनेला मिळालेला प्रतिसाद आदी बाबी या तपासणीदरम्यान स्पष्ट होतात. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये या तपासणीच्या अनुषंगाने तयारी केली जात आहे. तर, काही विभागात तपासणी सुरू झाली आहे. वार्षिक तपासणीचाच हा एक भाग असल्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांना यातील बारकावे चांगल्या प्रकारे माहीत आहेत. त्यामुळे प्रत्येक विभागात सध्या तपासणीची धामधूम सुरू आहे.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या तपासणी पथकाने १५ व १७ जानेवारी रोजी भूजल सर्वेक्षण विभाग, समाज कल्याण, कृषी विभाग, महिला व बालकल्याण विभागाची तपासणी केली आहे. त्यानंतर १८ ते २५ जानेवारी दरम्यान वित्त, शिक्षण विभाग माध्यमिक, सर्व शिक्षा अभियान, आरोग्य, पशुसंवर्धन, ग्रामीण पाणीपुरवठा, पंचायत, जि.प. हायस्कूल, ग्रामपंचायत, बांधकाम, प्राथमिक शिक्षण आणि सामान्य प्रशासन व जलसंधारण आदी विभागातील योजना व कामकाजाची तपासणी केली जाणार आहे