प्रेरणादायी : अमरावती ते कोलंबिया व्हाया सिद्धार्थनगर झोपडपट्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2022 08:15 AM2022-01-09T08:15:47+5:302022-01-09T08:16:01+5:30

चहा विक्रेत्याच्या मुलाचा थक्क करणारा प्रवास, उच्च शिक्षणासाठी उंच भरारी

Inspirational: Amravati to Columbia via Siddharthnagar slum Vikas tatad studying | प्रेरणादायी : अमरावती ते कोलंबिया व्हाया सिद्धार्थनगर झोपडपट्टी

प्रेरणादायी : अमरावती ते कोलंबिया व्हाया सिद्धार्थनगर झोपडपट्टी

Next

- गणेश वासनिक
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मनामध्ये शिकण्याची जिद्द असेल तर घरची आर्थिक परिस्थिती आड येत नाही, हे झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलाने सिद्ध करून दाखविले आहे. चहाची टपरी चालवणाऱ्या व्यक्तीच्या मुलाने झोपडीत अभ्यास करून अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात प्रवेश मिळविला आहे. तो शिक्षणासोबतच फावल्या वेळात नोकरी करणार असल्याने त्याला दरमहा दीड लाख पगार मिळेल. विकासच्या या भरारीमुळे त्याचे आई-वडील आणि मित्रमंडळी भारावून गेले आहेत.

विकासचे वडील कृष्णा तातड हे येथील दयासागर रुग्णालयाजवळ चहाची टपरी चालवतात, तर आई रेखा यांनी घरीच छोटेसे दुकान टाकून उदरनिर्वाहाचे साधन मिळविते. त्यातूनच मुलांच्या शिक्षणासाठी कशीबशी तरतूद करीत गेले. जेथे दहावीनंतर शाळा सोडून दोन-चार पैसे हाती येण्यासाठी कष्टाची वाट धरली जाते, त्या परिसरात राहूनही विकासने शिक्षणाकडे दुर्लक्ष केले नाही.

केशरबाई लाहोटी महाविद्यालयातून बी.कॉम. झाल्यानंतर मुंबईच्या  टीआयएसएसमधून पोस्ट ग्रॅज्युएशन केले. याच दरम्यान त्याला पेपर प्रेझेंटेशनसाठी अमेरिकेतील बोस्टन युनिव्हर्सिटीत जाण्याची संधी मिळाली. यावेळी त्याने भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या कोलंबिया विद्यापीठात शिक्षण घेतले त्या विद्यापीठाला भेट दिली. या विद्यापीठात आपल्याला शिक्षण घ्यायचे आहे, असा निर्धार केला. मात्र, या शिक्षणासाठी त्याला सव्वा कोटी रुपये खर्च येत होता.

    तीनदा नाकारला व्हिसा
n महाराष्ट्र सरकारची राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती विकासला मंजूर झाली. मात्र, व्हिसा काढताना या शिष्यवृत्तीशिवाय खात्यात किती पैसे आहेत, अशी विचारणा झाली. 
n खात्यात पैसे नसल्याने बँका कर्ज द्यायला तयार नव्हत्या. त्यामुळे तब्बल तीनवेळ व्हिसा नाकारला गेला. 
n अखेर चौथ्यांदा समाजातील काही नागरिकांनी त्याला ३० ते ४० लाख रुपयांची मदत केली आणि व्हिसाची प्रक्रिया पुढे सरकली. 
भविष्यात देशातील जातीव्यवस्था कमी व्हावी आणि शैक्षणिक व्यवस्थेतील भेदाभेद नष्ट करायचे आहे. लहान-मोठ्या शाळांमध्ये प्रचलित अभ्यासक्रमांऐवजी बदलत्या काळानुसार शिक्षण प्रणालीसाठी संशोधन करण्याचा मानस आहे.    
    - विकास तातड, अमरावती.

Web Title: Inspirational: Amravati to Columbia via Siddharthnagar slum Vikas tatad studying

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.