‘ओ निगेटिव्ह’ऐवजी रुग्णाला ‘बी पॉझिटिव्ह’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 10:31 PM2018-11-17T22:31:00+5:302018-11-17T22:31:15+5:30
किडनी स्टोनच्या आजारी महिला रुग्णाला शस्त्रक्रियेनंतर ‘ओ निगेटिव्ह’ऐवजी ‘बी पॉझिटिव्ह’ गटाचे रक्त चढविल्याचा धक्कादायक व गंभीर प्रकार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी घडला. यामुळे महिलेची प्रकृती चिंताजनक झाली असून, अतिदक्षता कक्षात उपचार सुरू आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : किडनी स्टोनच्या आजारी महिला रुग्णाला शस्त्रक्रियेनंतर ‘ओ निगेटिव्ह’ऐवजी ‘बी पॉझिटिव्ह’ गटाचे रक्त चढविल्याचा धक्कादायक व गंभीर प्रकार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी घडला. यामुळे महिलेची प्रकृती चिंताजनक झाली असून, अतिदक्षता कक्षात उपचार सुरू आहेत.
रुग्णालयातील महिला कर्मचाºयाने मोबाइलवर बोलत असताना रक्त चढविले. रुग्णाला देत असलेल्या रक्ताचा गट कोणता, याची शहानिशा करण्याचे भानही या कर्मचाºयाने राखले नाही, असा आरोप रुग्णाच्या नातेवाइकांनी केला. सुपर स्पेशालिटीचा चव्हाट्यावर आलेला भोंगळ कारभार चर्चेचा विषय ठरला आहे. नातेवाइकांच्या माहितीनुसार, शीला नवीन मेश्राम (रा. परसापूर) १५ नोव्हेंबर रोजी किडनी स्टोनच्या शस्त्रक्रियेकरिता विभागीय संदर्भीय रुग्णालय (सुपर स्पेशालिटी) येथे दाखल झाल्या. डॉक्टरांनी शस्त्रक्रियेपूर्वी ‘ओ निगेटिव्ह’ रक्त उपलब्ध करण्यास सांगितले. शीला यांचा मुलगा शुभम मेश्राम रक्त रक्तपेढीत गेला. यादरम्यान त्यांना रुग्णालयातून कॉल आला. शीला मेश्राम यांचे ब्लडप्रेशर वाढल्यामुळे त्यांना अतिदक्षता कक्षात हलविल्याचे सांगण्यात आले. शुभमने तात्काळ रुग्णालयात धाव घेतली. वॉर्डमधील लोकांना शुभमला सांगितले की, राठोड नामक शेजारच्या बेडवरील रुग्णासाठी आणलेले ‘बी पॉझिटिव्ह’ रक्त शिला मेश्राम यांना चढविण्यात आले. त्यामुळे रिअॅक्शन झाली आणि त्यांना अतिदक्षता कक्षात हलविण्यात आले.
महिला कर्मचाºयाच्या निष्काळजीपणामुळे शीला मेश्राम यांची प्रकृती बिघडल्याच्या माहितीवरून शुभमचे सहकारी राष्ट्रवादीचे प्रफुल्ल ठाकरे यांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेतली. त्यांना परिचारिका व डॉक्टर यांच्यापैकी कुणीही काहीच माहिती नसल्याचे सांगितले.
रक्त देताना कर्मचारी फोन कॉलवर
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील महिला कर्मचारी शीला मेश्राम यांना रक्त चढवित असताना त्यांना मोबाइलवर कॉल आला. महिला कर्मचाºयाने कॉल सुरू ठेवूनच ‘बी पॉझिटिव्ह’ रक्त चढविल्याचे शुभमचे म्हणणे आहे. इतकेच नव्हे, तर वॉर्डात ‘आॅन कॉल’ ड्युटी कोणाची आहे, ही बाबसुद्धा तेथील कर्मचाºयांना माहिती नसल्याचे प्रफुल्ल ठाकरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार
शुभम मेश्रामने या गंभीर प्रकाराची तक्रार शुक्रवारी सायंकाळी गाडगेनगर पोलीस ठाण्यात केली. यासंबंधाने पोलीस जिल्हा शल्यचिकित्सकांशी पत्रव्यवहार करणार आहेत. प्रफुल्ल ठाकरे यांनी शहर पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांच्याशी संपर्क करून हा गंभीर प्रकार त्यांना कळविला. पोलीस आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन चौकशीअंती कारवाईचे आश्वासन दिल्याची माहिती प्रफुल्ल ठाकरे यांनी दिली.
रुग्णाला विचारणा करीत आहोत. नेमके काय घडले, हे अद्याप माहिती पडले नाही. नर्सची चुकी असेल, तर कारवाई करू.
- पी.बी. भिलावेकर
विशेष कार्य अधिकारी
सुपर स्पेशालिटी