रोजगारक्षम शिक्षणासाठी संस्थांनी पुढाकार घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:10 AM2021-07-11T04:10:38+5:302021-07-11T04:10:38+5:30
अमरावती : येत्या काळात नवी शैक्षणिक पद्धती लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी या शैक्षणिक पद्धतीचाही ...
अमरावती : येत्या काळात नवी शैक्षणिक पद्धती लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी या शैक्षणिक पद्धतीचाही विचार करावा लागेल. डॉ. पंजाबराव देशमुख यांनी सुरू केलेली संस्था नावलौकिकास आली आहे. शैक्षणिक क्षेत्रासह साहित्य क्षेत्रातही संस्था कार्यरत आहे. त्यामुळे रोजगारक्षम शिक्षणासाठी ‘शिवाजी’ने पुढाकार घ्यावा, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी येथे केले.
श्री शिवाजी शिक्षण संस्था आणि श्री शिवाजी शारिरीक शिक्षण महाविद्यालयाच्यावतीने ‘रोजगार आणि विकासाच्या संधी’ याविषयी शनिवारी आयोजित ऑनलाईन चर्चासत्रात ना. सामंत सहभागी झाले. भविष्यात असे कार्यक्रम विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
शिक्षणक्षेत्राचा विकास होण्यासाठी प्राध्यापक भरतीचा निर्णय घेण्यात आला आहे. अर्थ विभागाची मान्यता मिळाल्यानंतर ही भरती प्रक्रिया प्रत्यक्ष सुरू होईल. तसेच प्राचार्यांची पदेही भरण्यासंदर्भात निर्णय होणार आहे. प्राध्यापकांच्या वेतनश्रेणी, वय, तसेच कालावधीचाही निर्णय योग्य विचार करूनच होईल, असेही ना. सामंत यांनी सांगितले. कार्यक्रमाला श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, सचिव शेषराव खाडे, उपाध्यक्ष गजानन पुंडकर, कोषाध्यक्ष दिलीप इंगोले, अशोक ठुसे, विजय ठाकरे आदी उपस्थित होते. चर्चासत्रापूर्वी पंचवटी चौकातील डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्यालाही ना. सामंत यांनी पुष्पार्पण केले.