संपावरील पशुधन पर्यवेक्षक व सहाय्यकांवर कारवाईचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:09 AM2021-07-24T04:09:58+5:302021-07-24T04:09:58+5:30
अनिल कडू परतवाडा : पशुसंवर्धन विभागाअंतर्गत कार्यरत, संपावर असलेल्या पशुधन पर्यवेक्षक व सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांविरुद्ध कार्यवाही करण्याचे निर्देश ...
अनिल कडू
परतवाडा : पशुसंवर्धन विभागाअंतर्गत कार्यरत, संपावर असलेल्या पशुधन पर्यवेक्षक व सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांविरुद्ध कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
पशुधन पर्यवेक्षक व सहाय्यक पशुधन विकास अधिकारी या संवर्गातील कर्मचाऱ्यांनी सर्व प्रकारच्या लसीकरण व अनुषंगिक सेवा त्वरित सुरू कराव्यात. शेतकऱ्यांना वेठीस धरू नये. मौल्यवान पशुधनाला वाऱ्यावर सोडणे योग्य नाही. असे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांनी म्हटले आहे.
पशुचिकित्सा व्यवसायी संघटना, महाराष्ट्र राज्य, शाखा अमरावती, यांचे निवेदनानुसार पशुधन पर्यवेक्षक, व सहाय्यक पशुधन विकास अधिकारी या संवर्गातील कर्मचाऱ्यांनी लसीकरण, सर्व ऑनलाइन कामे, मासिक- वार्षिक अहवाल बंद व कोणत्याही आढावा बैठकीला हजर राहणार नसल्याचे म्हटले आहे आहे.
--- पशुसंवर्धन समिती ठराव---
या काम बंदच्या पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विषय समितीने 15 जुलैला ठराव संमत केला. या ठरावानुसार पशुसंवर्धन विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नियमाप्रमाणे पशुधनाला लसीकरण व आरोग्य सेवा पुरवावी. अन्यथा त्यांचेवर दंडात्मक कार्यवाही करून त्यांचे पगार बंद करण्यात यावेत. त्यांचेवर शिस्तभंगाची कार्यवाही करण्याबाबत स्पष्ट निर्देश या समितीने दिले आहेत.
--- संपाबाबत संभ्रम पशुचिकित्सा व्यवसायी संघटना महाराष्ट्र राज्य अंतर्गत नियमानुसार काम करण्याचे स्पष्ट केले आहे. यात कृत्रिम रेतन वगळता इतर कोणतेही उपचार दवाखान्यात अथवा कार्यक्षेत्रात करणार नसल्याचे म्हटले आहे. यात शासकीय कर्मचारी व बिगर नोंदणीकृत खाजगी पदविकाधारकांची घालमेल बघायला मिळत आहे. आम्ही संपावर आहोत. असे मोठ्या अभिमानाने हे खाजगी पदविकाधारक सांगताहेत.
---- समांतर यंत्रणा---
पशुधन पर्यवेक्षक व सहाय्यक पशुधन विकास अधिकारी यांनी स्वतःवरील कामाचा तान कमी करण्याकरिता पशु सेवक ही संकल्पना अस्तित्वात आणली. याला वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही मुक संमती दिली. याकरिता त्यांनी पदविकाधारक खाजगी लोकांना हाताशी धरले आणि शासकीय कामांना जुंपले. आणि समांतर यंत्रणा अस्तित्वात आणली. यातूनच स्वयंघोषित डॉक्टर तयार झाले आहेत.
कोट:-- पदविकाधारक खाजगी पशु सेवकांना रजिस्ट्रेशन नंबर देण्यात यावा. पशुवैद्यक म्हणून प्रॅक्टिस करण्यास अनुमती देण्यात यावी.
सचिन यावले, खाजगी पशु सेवक अमरावती
दि.23/7/21