‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’साठी तालुके दत्तक घेण्याचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 10:19 PM2019-06-24T22:19:45+5:302019-06-24T22:20:06+5:30
जिल्ह्यातील पाणी पातळी खोलवर गेल्यामुळे रेनवॉटर हार्वेस्टिंग विषयी जनजागृती करण्यासाठी प्रत्येक विभागप्रमुखांनी जिल्ह्यातील तालुके दत्तक घ्यावे. तेथील पाण्याची पातळी वाढण्यासाठी प्रयत्न करावे, असे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे सोमवारी मुख्यकार्यपालन अधिकारी मनीषा खत्री यांना पत्राव्दारे दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यातील पाणी पातळी खोलवर गेल्यामुळे रेनवॉटर हार्वेस्टिंग विषयी जनजागृती करण्यासाठी प्रत्येक विभागप्रमुखांनी जिल्ह्यातील तालुके दत्तक घ्यावे. तेथील पाण्याची पातळी वाढण्यासाठी प्रयत्न करावे, असे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे सोमवारी मुख्यकार्यपालन अधिकारी मनीषा खत्री यांना पत्राव्दारे दिले आहेत.
जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतींसह जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील सर्व शासकीय इमारती, जिल्हा परिषद शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच नवीन घरकुल इमारतींना रेनवॉटर हार्वेस्टिंग करण्याचे दृष्टीने लक्ष देण्याची सूचनाही अध्यक्षांनी सर्व खातेप्रमुखांना दिल्या आहेत. जिल्ह्यात काही वर्षांपासून सातत्याने शेतकरी व नागरिकांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. अशातच पिण्याच्या पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात भासत असल्याने यंदाही अनेक गावांत पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावे लागत आहे. शासन व प्रशासनाकडून जिल्हाभरात पाणीटंचाई निवारणार्थ बऱ्याच गावात टँकर, विहीर अधिग्रहणाव्दारे पाणीपुरवठा केला जात आहे. परिणामी पाण्याचे गंभीर संकट लक्षात घेता भविष्यात पाणीटंचाई निवारण्याच्या दृष्टीने पावसाच्या दिवसांत रेनवॉटर हार्वेस्टिंगसारखे उपक्रम राबविणे गरजेचे आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेने पाऊल उचलले आहे. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील सर्व शासकीय इमारतींना रेनवॉटर हार्वेस्टिंग करणे व नागरिकांमध्ये याबाबत जनजागृती करून त्याचे महत्त्व व भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून या कामाला प्राधान्य द्यावे, अशा सूचनाही अध्यक्षांनी मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत प्रशासकीय यंत्रणेला दिल्या आहेत.
जलव्यवस्थापन समितीत होणार चर्चा
जिल्हा परिषदेच्या आगामी जलव्यवस्थापन समितीच्या सभेत रेन वॉटर हार्वेस्टिकचा मुद्दा मांडला जाणार आहे. पावसाचे पाणी जमिनीत जिरविण्याच्या दृष्टीने रेनवॉटर हार्वेस्टिंगसारखे उपक्रम प्रभावीपणे राबविणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने आगामी जलव्यवस्थापन समितीच्या सभेत हे मुद्दे मांडले जाणार आहेत.
जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील सर्व इमारतींवर रेनवॉटर हार्वेस्टिंग करणे आवश्यक आहे. सोबतच जनतेत याची जनजागृती व्हावी, यासाठी सर्व विभागप्रमुखांना पंचायत समिती दत्तक देण्याबाबत सीईओंना पत्राव्दारे कळविले आहे.
- नितीन गोंडाणे,
अध्यक्ष, जिल्हा परिषद