मोफत पाठ्यपुस्तके पुनर्वापरासाठी गोळा करण्याचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:12 AM2021-01-17T04:12:46+5:302021-01-17T04:12:46+5:30
अमरावती : समग्र शिक्षा अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तके या उपक्रमाखाली वाटप करण्यात आलेली पाठ्यपुस्तके जमा करून त्यांचा पुनर्वापर करण्यात यावा. ...
अमरावती : समग्र शिक्षा अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तके या उपक्रमाखाली वाटप करण्यात आलेली पाठ्यपुस्तके जमा करून त्यांचा पुनर्वापर करण्यात यावा. याकरिता जुनी पुस्तके जमा करावीत, असे निर्देश समग्र शिक्षा प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना १३ जानेवारी रोजी दिले आहेत.
समग्र शिक्षा अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तके या उपक्रमाखाली सन २०१९-२० व सन २०२०-२१ या वर्षी विद्यार्थ्याना वाटप केलेली सुस्थितीतील पाठ्यपुस्तके शाळांमध्ये पुनर्वापरासाठी जमा करण्यात यावी. यामुळे विद्यार्थ्यांना पुस्तके सुस्थितीत ठेवण्याची सवय लागेल, असे नमूद आहे. याअनुषंगाने सदर पुस्तके जमा करण्यासाठी पालकांना व विद्यार्थ्यांना आवाहन करावे, तसेच पालक व विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व समजावून सांगावे. जे पालक व विद्यार्थी स्वेच्छेने पाठयपुस्तके जमा करण्यास इच्छूक असतील त्यांचेकडून ते जमा करण्यात यावी. याबाबत संबंधितांना पुस्तके जमा करण्यासाठी सक्ती करू नये, अशा सूचना आदेशात नमूद आहेत. सदर पुस्तके शैक्षणिक सत्र २०२०-२१ च्या अखेरीस जमा करण्यात यावीत. याबाबत आतापासूनच माध्यम व इयत्तानिहाय किती पाठपुस्तकांचे संच जमा होतील याबाबत आढावा घेण्यात यावा, जेणेकरून तेवढे पाठ्यपुस्तकांचे संच सन २०२१-२२ च्या मागणीमधून कमी करता येतील. त्यामुळे याबाबत आढावा घेण्यासाठी व माहिती संकलनासाठी समग्र शिक्षा अंतर्गत विषयतज्ञ व विशेष शिक्षक यांची मदत घेण्याच्या सूचना शिक्षणाधिकारी यांना दिलेल्या आहेत.
कोट
समग्र शिक्षा अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तके या उपक्रमाखाली वाटप केली पाठ्यपुस्तके जमा करून त्यांचा पुर्नवापर करण्याबाबत सूचना वरिष्ठ कार्यालयाकडून मिळाल्या आहेत.पुस्तके जमा करण्याची कारवाई सक्तीने नसून स्वेच्छेने करावी अशा सूचना दिलेल्या आहेत.
ई.झेड खान
शिक्षणाधिकारी प्राथमिक