स्कायवॉकची विकासकामे मार्गी लावण्याचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:17 AM2021-09-15T04:17:18+5:302021-09-15T04:17:18+5:30
अमरावती : चिखलदऱ्यातील स्कायवॉक पर्यटकांचे आकर्षण ठरणार आहे. यामुळे येथे पर्यटकांची संख्यावाढ होणार असल्याने याठिकाणी करण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांसाठी ...
अमरावती : चिखलदऱ्यातील स्कायवॉक पर्यटकांचे आकर्षण ठरणार आहे. यामुळे येथे पर्यटकांची संख्यावाढ होणार असल्याने याठिकाणी करण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांसाठी सर्व विभागांनी येथील विकासकामे करावीत, असे निर्देश राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिले. मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात चिखलदारा विकास आराखड्यातील विकास प्रकल्पांच्या प्रगतीबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी आमदार राजकुमार पटेल, जिल्हाधिकारी पवनीत कौर, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी वैभव वाघमारे, धारणीचे तहसीलदार वैभव पाटोळे, चिखलदऱ्याच्या तहसीलदार माने उपस्थित होते.
चिखलदऱ्यात उभारण्यात येत असलेला स्कायवॉक देश-विदेशातील पर्यटकांसाठी आकर्षण असणार आहे. स्कायवॉकमुळे पर्यटकांच्या संख्येत वाढ होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प गतीने पूर्ण होणे गरजेचे आहे. स्काय वॉकवर जाण्यासाठी बिनतारी संदेशाच्या केंद्रासाठी दिलेली जमीन अधिग्रहित करावी किंवा इतर पर्याय तपासून पहावे. जमीन अधिग्रहण आवश्यक असल्यास त्यासाठी किती जमीन अधिग्रहित करावी लागणार आहे, हे तपासून थेट खरेदीचा प्रस्ताव सादर करावा. विकास प्रकल्प पूर्ण झाल्यास येथील पर्यटनाला चालना मिळणार असल्याने जमीन अधिग्रहणासाठी स्थानिक नागरिकांनी सहकार्य करावे. स्काय वॉकचे काम पूर्णत्वास येत आहे. केबलचे काम पूर्ण करण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. याचा पाठपुरावा करून परवानगी वेळेत उपलब्ध व्हावी, यासाठी प्रयत्न करावे. स्कायवॉकवर जाण्यासाठी आवश्यक असलेली जागा कोणत्या प्रकारे उपलब्ध होईल, याची तपासणी करावी. चिखलदारा येथील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी येथील पर्यटक आणि रहिवाशांना लागणाऱ्या पाण्याची माहिती घेण्याच्या सूचनाही ना. कडू यांनी दिल्यात.