टंचाई आराखडा सादर करण्याचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 12:38 AM2017-12-13T00:38:27+5:302017-12-13T00:39:13+5:30
जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई निवारणार्थ जिल्हा परिषदेने अद्यापही आराखडा सादर केलेला नाही.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई निवारणार्थ जिल्हा परिषदेने अद्यापही आराखडा सादर केलेला नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने जिल्हा परिषदेला ११ डिसेंबर रोजी स्मरणपत्र पाठविले. जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीने प्रस्तावित उपाययोजनांसह प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जिल्हा परिषद प्रशासनाला दिले आहेत.
आॅक्टोबर ते डिसेंबर २०१७, जानेवारी ते मार्च आणि एप्रिल ते जून २०१८ या तिन्ही टप्प्यांतील संभाव्य पाणीटंचाई आराखडा अद्यापही जिल्हाधिकारी कार्यालयाला अप्राप्त आहे. याची दखल विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी घेतली आहे. जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता, दरवर्षी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून आराखडा तयार केला जातो. मात्र, यंदा आराखडा तयार झाला नाही. त्यामुळे आता पाणीटंचाई आराखडा तयार करताना प्रत्यक्ष टंचाई असेल, त्याच गावांचा समावेश करण्यात यावा. पाणीटंचाई कालावधीतच होऊ शकेल अशा तुलनात्मक कमी खर्चाच्या उपाययोजना प्रस्तावित करण्यात याव्यात. त्याची दक्षता घेत आराखड्यातील प्रस्तावित उपाययोजनांची संख्या अचूकपणे नोंदवावी. अशाप्रकारे वस्तुनिष्ठ आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
आता जिल्हा परिषदेचा पाणीपुरवठा विभाग संभाव्य पाणीटंचाई आराखडा जिल्हाधिकाºयांकडे केव्हा सादर करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.