कोरोना न होताच खात्यात आली विम्याची रक्कम !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2021 04:00 PM2021-12-03T16:00:16+5:302021-12-03T16:03:34+5:30
तीन ते चार महिन्यांपूर्वी त्यांना रिलायंस इन्शुरंस कंपनीकडून व्हेरिफिकेशन कॉल आला. त्यावेळी आपल्याला कोरोना रुग्ण असे दाखवून बनावट विमा पॉलिसी काढण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले.
अमरावती : सामान्य रुग्णाला कोरोना रुग्ण असे दर्शवून एका व्यक्तीने त्या सामान्याचा विमा काढल्याचा धक्कादायक प्रकार येथे उघड झाला आहे. मात्र, आपण कोरोनाबाधित नव्हतोच, त्यामुळे ती खात्यात आलेल्या २.५० लाख रुपयांवर आपला हक्क नाही, अशी प्रामाणिक भावना ठेवून संबंधिताने ती रक्कम विमा कंपनीला परत केली. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात आपल्या पॅनकार्डचा गैरवापर करून व बाधित नसतानाही कोरोनारुग्ण दाखविल्याने आपली फसवणूक करण्यात आली, असा तक्रार अर्ज आर्थिक गुन्हे शाखेकडे करण्यात आला आहे.
याबाबत हुजेफा ताहेरअली गोरेवाला (५१, बोहरा गल्ली) यांनी तक्रार नोंदविली. बोहरा गल्लीतील एका महिलेशी असलेल्या जुन्या संबंधाने तिने जून २०२१ मध्ये वैद्यकीय विम्याबाबत सांगितले. तो विमा काढण्यासाठी वैद्यकीय चाचणी करावी लागेल, असेही सांगण्यात आले. त्यामुळे गोरेवाला दाम्पत्य श्रीकृष्णपेठेतील एका रुग्णालयात गेले. ४ ते ७ जून असे सलग चार दिवस आपल्याला केवळ झोपवून ठेवण्यात आले. मात्र, कुठलीही तपासणी करण्यात आली नाही. दरम्यान, तीन ते चार महिन्यांपूर्वी त्यांना रिलायंस इन्शुरंस कंपनीकडून व्हेरिफिकेशन कॉल आला. त्यावेळी आपल्याला कोरोना रुग्ण असे दाखवून बनावट विमा पॉलिसी काढण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले.
दरम्यान आपल्या पत्नीचे बनावट पॅनकार्ड वापरून २.५० लाख रुपये विमा देखील मंजूर करण्यात आला. मात्र, ती रक्कम आपण संबंधित विमा कंपनीला परत केली. मात्र, संबंधितांनी अजून कुणाकुणाची फसवणूक केली. कोरोना नसताना कुणाला बाधित दाखवून रक्कम मंजूर करवून घेतली, या सर्व प्रश्नांची चौकशी करावी, अशी विनंती हुजेफा गोरेवाला यांनी पोलिसांकडे केली आहे.
याबाबतची तक्रार प्राप्त झाली. अर्जदार व गैरअर्जदाराला बोलावण्यात आले. चौकशी करण्यात येत आहे. संबंधित रुग्णालयाला देखील विचारणा करण्यात येईल.
- शिवाजी बचाटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा