विमा कंपन्यांनी मिळविला ४,२३४ कोटींचा निव्वळ नफा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:15 AM2021-06-09T04:15:14+5:302021-06-09T04:15:14+5:30
अमरावती : यंदा शेतकऱ्यांना केवळ ७४३ कोटी रुपये पीक विम्याचे मिळाले. मात्र, उंबरठा उत्पादन ठरविताना शेतकऱ्यांवर अन्याय झाला. त्यामुळे ...
अमरावती : यंदा शेतकऱ्यांना केवळ ७४३ कोटी रुपये पीक विम्याचे मिळाले. मात्र, उंबरठा उत्पादन ठरविताना शेतकऱ्यांवर अन्याय झाला. त्यामुळे विमा कंपन्यांनी ४२३४ कोटींचा निव्वळ नफा मिळविला असून, महाविकास आघाडी सरकारच्या मेहेरबानीने हा सर्व प्रकार सुरू असल्याचा आरोप माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी सोमवारी पत्रपरिषदेतून केला आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात २०१९ मध्ये सरकारने पीक विमा कंपन्यांसोबत करारनाम्यानुसार ८५ लाख शेतकऱ्यांना ५७९५ कोटी रुपयांचा लाभ मिळाला होता. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकारने विमा कंपन्यांशी करार करताना निकष बदलविले, असा आरोप करण्यात आला. शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कम मिळाली नाही. खरीप २०२० मध्ये १३८ लाख शेतकऱ्यांनी ५,२१७ कोटी रुपये विम्याचा हप्ता भरला. मात्र, केवळ १५ लाख शेतकऱ्यांनाच ९७४ कोटी रुपये नुकसान भरपाई मिळाली. विमा कंपन्यांना ४,२३४ कोटींचा लाभ झाला, असे अनिल बोंडे म्हणाले. पत्रपरिषदेला भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, शहराध्यक्ष किरण पातुरकर, प्रमोद कोरडे, प्रशांत शेगोकार, राजेश पाठक आदी उपस्थित होते.