खरिपातील दहा पिकांसाठी विमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 01:28 AM2019-06-03T01:28:11+5:302019-06-03T01:28:42+5:30
जिल्ह्यात २०१९-२० या खरीप हंगामासाठी पंतप्रधान विमा योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. या योजनेत भात, ज्वारी, मका, तूर, मूंग, उडीद, भुईमूंग, तीळ, सोयाबीन, कापूस या पिकांचा समावेश राहणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर बाजार : जिल्ह्यात २०१९-२० या खरीप हंगामासाठी पंतप्रधान विमा योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. या योजनेत भात, ज्वारी, मका, तूर, मूंग, उडीद, भुईमूंग, तीळ, सोयाबीन, कापूस या पिकांचा समावेश राहणार आहे. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी विमा हप्त्यासह अंतिम प्रस्ताव बँकेकडे २४ जुलैपर्यंत सादर करावयाचे आहेत.
नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे, शेतकऱ्यांना नावीन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान, सामग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे, पिकांच्या नुकसानाच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे, कृषिक्षेत्रासाठीच्या पतपुरवठ्यात सातत्य राखणे, हा या योजनेचा उद्देश आहे. विमा संरक्षित रक्कम व शेतकऱ्यांनी भरावयाचा पीकविमा हप्ता योजनेंतर्गत राज्यात सन २०१९-२० साठी सर्वसाधारणपणे जिल्हास्तरीय समितीने निश्चित केलेल्या पीककर्ज दराप्रमाणे पीकनिहाय विमा रक्कम निश्चित करण्यात आली आहे. ही योजना कर्जदार शेतकऱ्यांना बंधनकारक आहे. खातेदाराशिवाय कुळांचे अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता हा खरीप हंगामासाठी २ टक्के, रबी हंगामासाठी १.५० टक्के असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
यंदाच्या खरीप हंगामामध्ये पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे. यासंबंधी अधिक माहितीकरिता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी कार्यालयांशी संपर्क साधावा.
- सुभाष नागरे, विभागीय कृषी सहसंचालक