रस्ते देखभाल-दुरुस्तीसाठी आता 'इंटिग्रेटेड सिस्टिम'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2018 07:45 PM2018-05-21T19:45:27+5:302018-05-21T19:45:27+5:30
खड्डेमुक्त महाराष्ट्राची घोषणा करूनही रस्त्याचा दर्जा सुधारत नसल्याने बांधकाम विभागाकडून रस्त्याच्या देखभाल-दुरुस्तीसाठी नवीन इंटिग्रेटेड सिस्टिम कार्यान्वित करण्यात आली आहे. या प्रणालीमध्ये लहान-लहान कामे देण्यापेक्षा मोठी कामे घेण्यावर भर असणार आहे.
-जितेंद्र दखने
अमरावती - खड्डेमुक्त महाराष्ट्राची घोषणा करूनही रस्त्याचा दर्जा सुधारत नसल्याने बांधकाम विभागाकडून रस्त्याच्या देखभाल-दुरुस्तीसाठी नवीन इंटिग्रेटेड सिस्टिम कार्यान्वित करण्यात आली आहे. या प्रणालीमध्ये लहान-लहान कामे देण्यापेक्षा मोठी कामे घेण्यावर भर असणार आहे. यामुळे एकूणच निविदांची संख्या कमी होणार आहे. याद्वारे रस्त्यांचा दर्जा राखण्यावर भर दिला जात आहे.
खड्डेमुक्त महाराष्ट्रासाठी १५ डिसेंबरची 'डेडलाईन' दिली होती. परंतु, मुदतीत हे काम पूर्ण होऊ शकले नाही. प्रत्येक कामाचे स्वरूप त्यामुळे निविदांची वाढणारी संख्या व त्यातच अतिरिक्त रस्ते विकासाचा भार आणि सुमार दर्जा यामुळे राज्यातील बहुतांश रस्ते आजही खड्डेमुक्त झालेले नाहीत. यावर उपाय म्हणून बांधकाम खात्याच्या देखभाल-दुरुस्तीसाठी नवीन इंटिग्रेटेड सिस्टिम कार्यान्वित केली आहे. यात नवीन रस्त्यांची कामे, रुंदीकरण, अथवा विस्ताराचे काम न घेता ते रस्ते टिकविण्यावर भर देण्यात येणार आहे. एक किंवा दोन कोटींची लहान कामे न घेता गट पद्धतीने मोठी कामे समाविष्ट करून घेण्यात येणार आहे. त्यामुळे निविदांची संख्या कमी करण्यावर भर दिला जात आहे. ही प्रणाली कार्यान्वित केल्यामुळे निविदांची संख्या कमी होणार आहे. यामध्ये राज्यातील प्रमुख मार्गांचा समावेश असेल. तसेच प्रमुख जिल्हा मार्गाचीही दुरुस्ती याद्वारे होणार आहे. रस्त्यांच्या स्थितीनुसार कामांचा प्राधान्यक्रम निश्चित करण्यात येणार आहे. नवीन रस्त्यांची कामे या प्रणालीमध्ये नसतील. गट पद्धतीने काम करून घेण्यावर अधिक भर असणार आहे. रस्त्यांची दुरुस्तीची कामे इंटिग्रेटेड पद्धतीने करण्याच्या सूचना राज्य शासनाकडून बांधकाम विभागाला देण्यात आल्या आहेत. त्यानुसार बांधकाम विभागाने नियोजन सुरू केले आहे. या प्रणालीच्या माध्यमातून राज्यभरातील रस्त्यांची दुरुस्ती होणार आहे. सुरुवातीला एक पदरी नंतर दुपदरी रस्त्यांची दुरुस्ती होणार आहे.