प्रखर देशभक्ती, हास्य व्यंगाने रंगली मैफल
By admin | Published: May 4, 2016 12:28 AM2016-05-04T00:28:55+5:302016-05-04T00:28:55+5:30
कर्नल व्ही.पी. सिंग यांच्या प्रखर देशभक्तीचे स्फुल्लिंग जागृत करणाऱ्या कविता तर सुरेंद्र शर्मा यांच्या ....
महाराष्ट्र दिनाचे औचित्य : मराठी-हिंदी हास्य कविसंमेलनात अमरावतीकर लोटपोट
अमरावती : कर्नल व्ही.पी. सिंग यांच्या प्रखर देशभक्तीचे स्फुल्लिंग जागृत करणाऱ्या कविता तर सुरेंद्र शर्मा यांच्या पत्नीवरील व्यंगबाण व पदमश्री अशोक चक्रधर यांच्या मनोरंजक व भावस्पर्शी हिंदी कविता तर अशोक नायगावाकर, अरुण म्हात्रे व वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांच्या मराठी हास्य कविता व किस्स्यांनी श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या मैदानावरील हजारो प्रेक्षकांना लोटपोट केले. प्रखर देशभक्ती व हास्यरसात सोमवारच्या रात्रीची मैफल चांगलीच रंगली.
जाणता राजा वेलफेयर सोसायटीच्या वतीने आयोजित हिंदी मराठी हास्य कविसंमेलनात अशोक नायगावकर यांच्या लोकमान्य टिळकावरील गाजलेल्या कवितेने कविसंमेलनाला प्रारंभ झाला. या कवितेच्या दरम्यान नायगावकर यांनी दैनंदिनी जीवनातील अनेक खुमासदार किस्से सांगून मैफिलीत रंग भरला. रामदास फुटाणे यांच्या ‘कटपीस’ या कवितेतून सामाजिक जाणिवेसह जीवनातील वास्तविकता स्पष्ट झाली. अरुण म्हात्रे यांच्या गझल गायकीने कवितेतील श्रृंगार व प्रेम प्रेक्षकांसमोर उलगडले. कारगीलच्या युद्धात सहभागी झालेले व ३० वर्षे सैन्यात सेवा देणारे कर्नल व्ही.पी. सिंग यांच्या प्रखर देशभावनेच्या कवितांनी वातावरण भारावून गेले होते. तसेच सैन्याची वास्तविकता त्यांच्या कवितेतून रसिकांसमोर उलगडली. त्यांनी सादर केलेल्या कवितेच्या दरम्यान भारत माता की जय म्हणून टाळ्यांच्या कडकडाटाने प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
हास्य खजिना म्हटल्या जाणारे सुरेंद्र शर्मा यांनी घरवालीवर केलेल्या टिप्पणीवरून तसेच हास्य रचनांवरून संपूर्ण अमरावतीकरांना लोटपोट केले. पद्मश्री अशोक चक्रधर यांनी राजकारणावर टीका तर पारिवारिक लहान गोष्टींवरून कविता कशा निर्माण होतात तसेच जीवनामध्ये फक्त प्रेमच ही शक्ती आहे. जी आपल्या एकमेकांशी बांधून ठेवते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक सोमेश्वर पुसतकर यांनी केले. (प्रतिनिधी)