प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाची तीव्रता वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 11:36 PM2019-02-13T23:36:09+5:302019-02-13T23:36:56+5:30
तीन दिवसांपासून शासन अंत पाहत आहे. मात्र, आमच्या एकीचा वज्रनिर्धार कायम आहे. सोबत आता कुटुंबीयही रस्त्यावर आल्याने आमची ताकद कैकपटींनी वाढली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : तीन दिवसांपासून शासन अंत पाहत आहे. मात्र, आमच्या एकीचा वज्रनिर्धार कायम आहे. सोबत आता कुटुंबीयही रस्त्यावर आल्याने आमची ताकद कैकपटींनी वाढली. आम्ही सर्व इथे असल्याने गुराढोरांकडे दुर्लक्ष आहे. त्यांनाही येथे बांधू; मात्र आता आंदोलनातून माघार घेणार नाही. ही आरपारची लढाई आहे. गुरुवारपासून हा लढा आणखी तीव्र करण्याचा निर्धार प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केला.
विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समितीद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाची धग तिसऱ्या दिवशीही कायम आहे.
कुटुंबीयही सोबतीला
आंदोलनात आता प्रकल्पग्रस्तांचे कुुटुंबीयदेखील सहभागी झाले आहेत. गुरुवारपासून घरची गुरेही या ठिकाणी आणायची तयारी सुरू केल्याने आंदोलनाची तीव्रता अणखीनही वाढणार आहे. दरम्यान, दुसºया दिवसाची रात्रही प्रकल्पगस्तांनी उघड्यावर काढली. प्रशासनाद्वारा जिल्हास्तरावरच्या मागण्या सोडविण्यातच वेळ घालविला जात आहे.
जिल्हाधिकारी शैलेश नवाल बुधवारी सकाळी रूजू झाले. त्यांनी आंदोलकांची भूमिका समजून घेतली अन् दुपारी राज्य निवडणूक आयोगाच्या तीन दिवसांच्या प्रशिक्षणासाठी पुण्याला रवाना झाले. ते आता सोमवारीच जिल्ह्यात दाखल होेणार असल्याने आपसूकच या प्रकरणाची सूत्रे आता भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी व अजय लहाने यांच्याकडे आली आहेत. दरम्यान, विभागीय आयुक्तांनी जिल्हा प्रशासनाशी व आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. पालकमंत्र्यांनीदेखील जलसंपदा मंत्र्यांकडे शिष्टार्ई केली. मात्र, तोडगा आंदोलनकर्त्यांना मान्य नाही तसेच आंदोलनाची माघार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले. आंदोलन सुरूच असताना आमच्यातील काहीशी शासनाने व्हिसीद्वारे संवाद साधावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. दरम्यान रात्री १०.३० च्या सुमारास आंदोलन स्थळालगत एका कारला आग लागली असता आंदोलनकर्त्यांनी कॅनमधील पिण्याचे पाणी टाकून आग विझविली.
गाडगेनगर ठाण्यात ५४ आंदोलकांविरुद्ध गुन्हा
विदर्भ बळिराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समितीच्या एकूण ५४ आंदोलनकर्त्यांविरुध्द गाडगेनगर पोलिसांनी मंगळवारी गुन्हा नोंदविला. प्रकल्पग्रस्तांनी आपल्या मागण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडून रहदारीस अडथळा निर्माण केला तसेच सामान्य जनतेच्या अधिकाराचे हनन करून तणाव निर्माण केल्याचे पोलीस तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी भादंविचे कलम १४३, ३४१, १८८, सहकलम १३५, सहकलम ७, क्रिमीनल अमेंटमेंट अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
दात्यांचा ओघ सुरू
सोमवारपासून दिवसा उन्ह अन् रात्री थंडी अंगावर झेलत आंदोलनकर्ते जिल्हा कचेरीसमोर ठिय्या देऊन आहेत. त्यांच्या मदतीला आता दातेदेखील समोर येत आहेत. आंदोलकांच्या जेवणासाठी मदतीचे हात समोर आले आहेत. ठिय्याच्या ठिकाणीच आंदोलक महिलांद्वारे भाजीपाला निवडून सामूहिकरीत्या स्वयंपाक केला जात आहे. तिथेच जेवण झाल्यावर पुन्हा ठिय्या आंदोलनात सहभागी होत असल्याचे दिसून आले.
अमरावतीकरांनी व्हावे सहभागी
अमरावतीकरांना आज जे पाणी मिळत आहे, त्या अप्पर वर्धा प्रकल्पासाठी आमच्या जमिनी अधिग्रहीत झालेल्या आहेत. शासनाच्या दुटप्पी भूमिकेमुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली. १९७६ सालच्या अप्पर वर्धाच्या प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळालेला नाही. त्यामुळे अमरावतीकरांनीही या आंदोलनात सहभागी होऊन आमचा उत्साह वाढवावा, असे आवाहन वृद्ध प्रकल्पग्रस्तांनी केले.
आंदोलकांशी संवाद साधण्यात येऊन आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली. याबाबत जलसंपदा सचिवांशी संवाद झाला. येत्या कॅबिनेट बैठकीच्या दिवशी बैठकीसाठी तारीख निश्चित करण्यात आली. तसे पत्र दिले आहे.
- पीयूष सिंह
विभागीय आयुक्त
शासन बैठकीसंदर्भात अधिकृत पत्र आम्हाला प्राप्त नाही. पालकमंत्र्याच्या पत्रावर बैठकीची तारीख नाही. त्यामुळे आम्ही विश्वास ठेवू शकत नाही. आता आंदोलकांचा रोष वाढत आहे. उद्रेक कसा होईल, हे सांगता येत नाही.
- मनोज चव्हाण
अध्यक्ष, कृती संघर्ष समिती