चारचाकी वाहने चोरणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद, पाच वाहने जप्त
By प्रदीप भाकरे | Published: April 18, 2023 05:31 PM2023-04-18T17:31:47+5:302023-04-18T17:32:34+5:30
स्थानिक गुन्हे शाखेचे बंपर यश
अमरावती : बनावट चावीद्वारे चारचाकी वाहने चोरल्यावर दवाखान्यासाठी पैशांची गरज असल्याची बतावणी करून ती विक्री करणाऱ्या टोळीतील चार अट्टल चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेने १८ एप्रिल रोजी अटक केली. त्यांच्याकडून सहा चारचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत. त्यांच्या आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याने त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक तपन कोल्हे यांच्या नेतृत्वातील ‘टिम एलसीबी’ने ही दमदार कारवाई केली.
मोहम्मद मुदसीर उर्फ टॅटू उर्फ एम. डी. उर्फ जकी मोहम्मद युनूस (२५, रा. अकोला, मंगेश कसनदास राठोड (२५, रा. जनुना, अकोला), शेख मेहबूब शेख हसन (४०, रा. जमील कॉलनी, अमरावती) व मुख्तार अली करामत अली (२५, रा. अमरावती) अशी अटक चोरांची नावे आहेत. वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक मोहम्मद तस्लीम यांच्या नेतृत्वात एक पथक स्थापन करण्यात आले होते.
अशा गुन्ह्यांचा तपास करीत असताना अकोला येथील सराईत चारचाकी वाहनचोर मोहम्मद मुदसीर उर्फ टॅटू हा अमरावती शहरातील जमजम कॉलनी येथे फिरत असून त्याने जिल्ह्यातूनही चारचाकी वाहने चोरल्याची माहिती पथकाला मिळाली. त्या आधारावर पथकाने त्याला १७ एप्रिल रोजी अटक केली. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने सहकारी मंगेश राठोड, शेख मेहबूब व मुख्तार अली व आणखी दोघांच्या मदतीने जिल्ह्यातील तिवसा, चांदूर रेल्वे व दत्तापूर ठाण्याच्या हद्दीतून बनावट चावीद्वारे चारचाकी वाहन चोरीची कबुली दिली. त्यानुसार त्याच्या तीनही सहकाऱ्यांनाही अटक करण्यात आली.
जालना, भद्रावतीतून चोरली वाहने
दवाखान्यात पैसे जमा करावयाचे असून वाहनाची कागदपत्रे फायनान्स कंपनीमध्ये जमा असल्याची बतावणी करीत क्रमांक बदलवून त्या वाहनांची विक्री केल्याचे तपासात उघड झाले. चौकशीत मुख्य आरोपी मुख्तार अली व मोहम्मद मुदसीर उर्फ टॅटू यांनी चौकशीत जालना येथून दोन, चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथून एक वाहन चोरल्याचे सांगितले. त्यांच्याकडून एकूण सहा गुन्हे उघडकीस आले असून सहा वाहनेही जप्त करण्यात आली आहेत.
यांनी केली कारवाई
पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक मोहम्मद तस्लीम शेख गफूर, संजय शिंदे व मुलचंद भांबुरकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक त्र्यंबक मनोहर, सुनील महात्मे, पुरुषोत्तम यादव, सय्यद अजमत, मंगेश लकडे, चंद्रशेखर खंडारे, सचिन म्हसांगे, नीलेश डांगोरे, संजय प्रधान, हर्षद घुसे, शैलेश वानखडे, सागर धापड, रितेश वानखडे यांनी ही यशस्वी कारवाई केली.