समादेशकाच्या कार्यपध्दतीने कोरोनाला अटकाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:17 AM2021-09-08T04:17:15+5:302021-09-08T04:17:15+5:30
फोटो पी ०७ पोद्दार अमरावती : विशिष्ट कार्यपध्दती अवलंबवून कोरोनाच्या दुसर्या लाटेपासून येथील एसआरपीएफ जवानांना सुरक्षित ठेवण्यात यश आले ...
फोटो पी ०७ पोद्दार
अमरावती : विशिष्ट कार्यपध्दती अवलंबवून कोरोनाच्या दुसर्या लाटेपासून येथील एसआरपीएफ जवानांना सुरक्षित ठेवण्यात यश आले आहे. एसआरपीएफचे समादेशक हर्ष पोदार यांनी त्यासाठी विशिष्ट कार्यपध्दती अंगिकारली होती. भारतात कोविडची दुसरी लाट अमरावती शहरातून सुरू झाली होती. त्यापासून एसआरपीएफच्या जवानांना सर्वात जास्त धोका होता. त्यांना राज्याबाहेरील निवडणुकांसाठी तसेच संपूर्ण राज्य आणि देशातील नक्षल विरोधी अभियानासाठी बंदोबस्त कामी सर्वत्र तैनात केले जात होते आणि कोविड बंदोबस्त कामीही तैनात करण्यात येत होते . अशा प्रकारची गंभीर परिस्थिती असूनही अमरावती बटालियन मध्ये एकही एसआरपीएफ पोलीस अंमलदार किंवा त्यांच्या कुटुंबियांचा कोविडच्या दुसऱ्या लाटे दरम्यान मृत्यू झाला नाही.
////////
विशेष केस स्टडी म्हणून प्रकाशित
कमांडंट आयपीएस हर्ष पोद्दार यांनी सुरू केलेल्या विशेष कार्यपद्धतीमुळे हे शक्य झाले. या विशेष कार्यपद्धतीला अमेरिकेतील फ्लेचर फोरम ऑफ वर्ल्ड अफेयर्सने विशेष केस स्टडी म्हणून प्रकाशित केले आहे. फ्लेचर फोरम हे जागतिक शासन आणि धोरणाशी संबंधित मुद्द्यावर एक अग्रगण्य आंतरराष्ट्रीय जर्नल आहे.
/////////
म्हणून राहिला कोरोना दूर
अमरावती एसआरपीएफ ग्रुप ९ मध्ये वापरल्या जाणाऱ्या मुख्य कार्यपद्धतीमध्ये पोलीस अंमलदार आणि त्यांच्या कुटुंबीयांचे १०० टक्के लसीकरण, तीन स्तरीय सार्वजनिक अंतर ठेवण्याची यंत्रणा आणि निदान चाचण्या ह्या मुख्य गोष्टींचा अवलंब करण्यात आला. न्युमोनिया, साईटोकिन वादळ, रक्त गोठणे आणि अवयव निकामी होणे, या चार कारणामुळे प्रामुख्याने कोरोनाग्रस्ताचा मृत्यू होतो. त्यामुळे एसआरपीएफमध्ये कोविड पॉझिटिव्ह लोकांमध्ये या सर्व लक्षणांसाठी नियमित प्रकारे चाचण्या घेण्यात आल्या. त्यामुळे त्यांची प्रकृती अचानकपणे गंभीर झाली नाही. दुसऱ्या लाटे दरम्यान एकाही पोलीस अंमलदार किंवा त्यांचे कुटुंबीयांचा मृत्यू झाला नाही.