जिल्हा बँकेत 700 कोटींच्या ठेवींसह व्याज सुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2021 05:00 AM2021-10-02T05:00:00+5:302021-10-02T05:00:56+5:30

आता निवडणूक लागताच विरोधक ७०० कोटींच्या ठेवी आणि ३ कोटी ३९ लाखांच्या दलालीचा मुद्दा उपस्थित करीत आहे. परंतु, हे प्रकरण आम्हीच बाहेर काढले. एमडी, सीओंवर कारवाई केली, हे बँकेच्या रेकॉर्डवर आहे, असा दावा बबलू देशमुख यांनी केला. आमच्यावर ईडी, सीडी काहीही लावा एकाही पैशाच्या भ्रष्टाचार झाला नाही. याउलट विरोधकांनी बदनामी करण्यासाठी ईडीचे कार्टून लावले, असा आरोपही त्यांनी केला.

Interest secured with Rs 700 crore deposits in District Bank | जिल्हा बँकेत 700 कोटींच्या ठेवींसह व्याज सुरक्षित

जिल्हा बँकेत 700 कोटींच्या ठेवींसह व्याज सुरक्षित

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ७०० कोटींच्या ठेवीसह व्याजदेखील सुरक्षित आहे. विरोधकांकडे कोणताही मुद्दा नसल्याने ते मतदारांची दिशाभूल करीत आहे. मात्र, ‘सहकार’चा मतदार सुज्ञ असून, ११ वर्षे आम्ही बँक कशी सांभाळली आणि शेतकऱ्यांचे कुणी भले केले, हे त्यांना चांगले ठाऊक आहे, असे मत सहकार पॅनलचे नेते तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत व्यक्त केले. 
सन १९९५ ते १९९९ मध्ये बँकेची धुळधाण झाली होती. विपरीत परिस्थितीत बँकेची धुरा सांभाळताना ५०० कोटींची ठेव असलेली ही बँक आता २५०० कोटींच्या ठेवीवर पोहचली आहे. 
ही किमया शेतकरी, ग्राहक, ठेवीदार यांच्यामुळे शक्य झाली आहे. मात्र, आता निवडणूक लागताच विरोधक ७०० कोटींच्या ठेवी आणि ३ कोटी ३९ लाखांच्या दलालीचा मुद्दा उपस्थित करीत आहे. परंतु, हे प्रकरण आम्हीच बाहेर काढले. एमडी, सीओंवर कारवाई केली, हे बँकेच्या रेकॉर्डवर आहे, असा दावा बबलू देशमुख यांनी केला. आमच्यावर ईडी, सीडी काहीही लावा एकाही पैशाच्या भ्रष्टाचार झाला नाही. याउलट विरोधकांनी बदनामी करण्यासाठी ईडीचे कार्टून लावले, असा आरोपही त्यांनी केला. दलालीचे ३ कोटी ३९ लाख रूपये पुन्हा परत आणू, असा विश्वास बबलू देशमुख यांनी व्यक्त केला. यावेळी पालकमंत्री यशोमती ठाकूर, आमदार बळवंत वानखडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे, भाजपचे प्रमाेद कोरडे, सुरेखा ठाकरे, संतोष महात्मे, बाळासाहेब हिंगणीकर, प्रकाश काळबांडे, मोनिका वानखडे, मनीष कोरपे, पुरुषोत्तम अलोणे, हरिभाऊ मोहोड यासह सहकार पॅनलचे उमेदवार उपस्थित होते. 

जिल्हा महिला बँक, डॉ.पंजाबराव देशमुख अर्बन बँकेचे काय झाले?
जिल्हा महिला बँक, डॉ.पंजाबराव देशमुख अर्बन बँकेची काय स्थिती करून ठेवली, याकडे विरोधकांनी लक्ष द्यावे, असा टोला बबलू देशमुख यांना लगावला. पीडीएमसी बँकेत २८ कोटींचे राईटअप नसल्याचा उल्लेख त्यांनी केला. तालुक्याच्या ‘गारुडी’ने पतसंस्थेची वाट लावली. ७ ते ८ वर्षे पैसे गायब ठेवले, असाही आरोप देशमुख यांनी केला.

-तर संचालकांनी तक्रार का केली नाही?
विरोधक संचालकांची बैठक ही ५ ते १० मिनिटात गुंडाळत असल्याचा आरोप करीत सुटले आहेत. मात्र, अशी परिस्थिती होती तर त्यावेळी संचालकांनी डीडीआरकडे तक्रार का केली नाही, असा सवाल देशमुख यांनी उपस्थित केला. संचालकांचे ’समाधान’ होते म्हणून बैठक ५ ते १० मिनिटात समाप्त व्हायची, असे ते म्हणाले. त्यावेळी विरोधक संचालक  काय ‘हजामपट्टी’ करीत होते, असा टोला त्यांनी लगावला.

ही अमरावतीची संस्कृती नाही : पालकमंत्री

निवडणूक येतात आणि जातात. मात्र, जिल्ह्याची वेगळी संस्कृती, ओळख असून, ही ढासळू देऊ नका. आता तर ईडीची नोटीसही चिल्लर झाली असून, यापुढे ग्रामपंचायत सदस्य, सरपंचांना नोटीस आल्यास आश्चर्य वाटू नये, असा टोला पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी शुक्रवारी येथे लगावला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित पत्रपरिषदेत त्या बोलत होत्या. जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची आहे. मात्र, निवडणुकीत ज्या पद्धतीने चिखलफेक होत आहे, ते योग्य नाही. विदर्भात अमरावती व अकोला या दोनच बँक व्यवस्थित आहेत, असे त्या म्हणाल्या. विरोधकांनी साखर कारखाने, दूध संस्था, सूतगिरणीच्या नावे कर्ज वाटप केले, त्याचे काय झाले, हे तपासून घ्यावे, असा टोला पालकमंत्री ठाकूर यांनी लगावला. ही बँक सुस्थितीत ठेवण्यासाठी आता संघर्ष म्हणून लढत असल्याचे त्या म्हणाल्या. ‘बंटी, बबली’, अपहार, लाचखोर असा शब्दप्रयोग होणे चांगले नाही, असे त्या म्हणाल्या.

 

Web Title: Interest secured with Rs 700 crore deposits in District Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.