आरटीई प्रवेशासाठी द्यावा लागणार अंतराचा पुरावा

By admin | Published: February 15, 2017 12:13 AM2017-02-15T00:13:21+5:302017-02-15T00:13:21+5:30

आरटीई अंतर्गत प्रवेश घेण्यासाठी घरापासून शाळेचे अंतर किती आहे, याचा पुरावा द्यावा लागणार आहे.

Intermediate Proof | आरटीई प्रवेशासाठी द्यावा लागणार अंतराचा पुरावा

आरटीई प्रवेशासाठी द्यावा लागणार अंतराचा पुरावा

Next

बनवाबनवीला चाप : यंदाच्या प्रवेश प्रकियेपासून नियम लागू
अमरावती : आरटीई अंतर्गत प्रवेश घेण्यासाठी घरापासून शाळेचे अंतर किती आहे, याचा पुरावा द्यावा लागणार आहे. खोटी माहिती देऊन आरटीई प्रवेशाचा फायदा करून घेणाऱ्यांना चाप लावण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला असून यंदाच्या प्रवेश प्रक्रियेपासून हा नियम लागू केला जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली. आर्थिक मागास घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा हक्क मिळावा, या उद्देशाने मोफत आणि सक्तीचा शिक्षण हक्क कायदा २००९ करण्यात आला याअंतर्गत तीन वर्षांपासून शाळांतील २५ टक्के जागांवर आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो. ही प्रवेश प्रक्रिया आॅनलाईन पद्धतीने राबविण्यात येते. तांत्रिक अडचणी शाळांची नोंदणी आडमुठेपणामुळे ही प्रक्रिया सुरूवातीपासूनच चर्चेचा विषय ठरली. अनेक गरजू विद्यार्थी या योजनेपासून वंचित असून दुसरीकडे काही पालक खोटी माहिती देत असल्याचे वास्तवही समोर आले आहे.
याअंतर्गत प्रवेश घेण्यासाठी घरापासून एक किलोमीटर परिसरातील शाळा प्रवेशासाठी निवडावी अथवा जागा पूर्ण भरल्या असेल तर तीन किलोमीटरपर्यंतच्या शाळेची निवड करावी, असा निकष आहे. परंतु अनेक पालक विशिष्ट शाळेतच प्रवेश मिळविण्यासाठी खोटी कागदपत्रे सादर करतात. स्वत:चे घर असूनही भाड्याने राहत असल्याचे दाखवणे, खोटी नोटरी सादर करणे तसेच उत्पन्न एक लाख रूपयांपेक्षा अधिक असूनही कमी उत्पन्न दाखवून प्रवेश मिळविणे, असे प्रकार होत असल्याचेही निदर्शनास आले. त्यामुळे यंदाच्या प्रवेश प्रक्रियेपासून घर आणि शाळेच्या अंतराचा पुरावा देण्याचा नियम लागू करण्यात आला आहे. या नियमाची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार असून स्वत:चे घर असेल तर तो पुरावा आणि नसेल तर दुय्यम उपनिबंधकाकडील भाडे करारनामा आवश्यक आहे, असे शिक्षण विभागाने म्हटले आहे. (प्रतिनिधी)

अनेक जण खोटा पत्ता दाखवून प्रवेश घेत असल्याच्या अनेक तक्रारी शासनाकडे करण्यात आल्या होत्या त्यामुळे घराच्या पत्यासाठी नुसती नोटरी चालणार नाही ? दुय्यम उपनिबंधकाकडे नोंदणीकृत भाडेकरार आवश्यक असणार आहे. गरजू विद्यार्थ्याना हा प्रवेश मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला.
किशोर पुरी, शिक्षण विस्तार अधिकारी प्राथमिक शिक्षण विभाग

Web Title: Intermediate Proof

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.