अवघ्या सहा हजार रुपयासाठी इंटरनेट सेवा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:09 AM2021-07-12T04:09:20+5:302021-07-12T04:09:20+5:30
श्यामकांत पाण्डेय धारणी : गेल्या महिन्याभरापासून उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयातील कामे इंटरनेट सेवा उपलब्ध नसल्यामुळे खोळंबली आहेत. महिनाभरापूर्वी जलदी फाय ...
श्यामकांत पाण्डेय
धारणी : गेल्या महिन्याभरापासून उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयातील कामे इंटरनेट सेवा उपलब्ध नसल्यामुळे खोळंबली आहेत.
महिनाभरापूर्वी जलदी फाय ही इंटरनेट सेवा या कार्यालयात सुरू होती. मात्र, मध्यंतरीच्या काळात वीज कोसळल्यामुळे संबंधित यंत्रणा जळाल्याने कुचकामी ठरली आहे. ही इंटरनेट सेवा सुरु करण्यासाठी कार्यालयातील उपस्थित कर्मचाऱ्यांनी अनेक प्रयत्न केले. मात्र, ती दुरुस्त झाली नाही. याबाबत वरिष्ठांना सूचना देऊन ब्रॉडबँड सेवा उपलब्ध करून देण्याबाबत निवेदन सादर करण्यात आले आहे. मात्र, त्यावर आतापर्यंत कोणतीच कार्यवाही झाली नसल्यामुळे कार्यालयातील ऑनलाईन सुरू असलेली सर्व कामे खोळंबली आहेत. या कामाकरिता अवघे पाच ते सहा हजार रुपये खर्च अंदाजित प्रस्तावित असताना, जिल्हा स्तरावरील कार्यालयाकडून दुर्लक्ष होत असल्यामुळे लोकांची कामे खोळंबली आहेत . त्याचप्रमाणे ऑनलाइन कामाच्या शक्तीमुळे येथील सर्व कामे खोळंबली आहेत.
अर्जांची ऑनलाइन नोंद, फेरफार नोंदींचे अद्ययावतीकरण तसेच इतर सर्व कामे ऑनलाइन पद्धतीने करावी लागतात. मात्र, इंटरनेट सेवा बंद झाल्यामुळे भूमिअभिलेख कार्यालय कामाविना ठप्प पडले आहेत. या कार्यालयात उपाधीक्षक हे कधीकधी उपस्थित राहत असल्यामुळेसुद्धा याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे जनतेची व शेतकऱ्यांची कामे मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहेत. या गंभीर बाबीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.