दुबारच्या अहवालास कर्मचारी संपाची बाधा
By admin | Published: July 13, 2017 12:11 AM2017-07-13T00:11:02+5:302017-07-13T00:11:02+5:30
यंदाच्या खरीपात जिल्ह्यात झालेल्या साडेचार लाख हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी दीड लाख हेक्टरवर दुबार पेरणीची शक्यता असल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला.
अहवाल केव्हा? : दीड लाख हेक्टर क्षेत्रात पेरणीला मोड येण्याची शक्यता
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : यंदाच्या खरीपात जिल्ह्यात झालेल्या साडेचार लाख हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी दीड लाख हेक्टरवर दुबार पेरणीची शक्यता असल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला. शासनाने या विषयीचा अहवाल मागितला असताना क्षेत्रिय कर्मचारी संपावर असल्याने कृषी विभाग तोंडघसी पडला आहे. अद्याप जिल्ह्याचे नजरअंदाज बाधीत क्षेत्र अहवालच तयार नसल्याचे वास्तव आहे.
कृषी विभागाचा सुधारीत आकृतीबंध तयार करण्यासोबतच इतरही प्रलंबीत मागण्यासाठी राज्य कृषी सहाय्यक संघटनेव्दारा १० जुलै पासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. जिल्ह्यात एक जून ते १२ जुलै दरम्यान अपेक्षित सरासरीच्या केवळ ५० टक्के प्रमाणात पाऊस पडला. परिणामी जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.
अश्या परिस्थितीत गावागावातील कृषी सहाय्यक संपावर गेल्याने शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनात बाधा निर्माण झाली आहे. या आपातस्थितीचा आढावा घेण्यासाठी शासनव्दारा दुबार पेरणीचे संभाव्य क्षेत्राचा अहवाल मागविला असता क्षेत्रिय कर्मचारी संपावर असल्याने हा अहवालच तयार झाला नसल्याची माहिती समोर आली आहे. जिल्ह्यातील केवळ पाच तालुक्यांचे अहवाल पाठविण्यात आले आहे तर उर्वरीत नऊ तालुक्यातून हे अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयास अद्याप अप्राप्त आहेत. याबाबत तालुक्यांचा अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधला असता कृषी सहाय्यक संपावर असल्याने माहिती उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. पावसाअभावी बिकट परिस्थिती उद्भवल्याने शासनाची यंत्रणाच बेपर्वा असल्याने शेतकऱ्यांना आता अस्मानी सोबत सुल्तानी संकटाचा सामना करावा लागत असल्याचे वास्तव आहे.
सद्यस्थितीत ६५ टक्क्यावर क्षेत्रात पेरणी
जिल्ह्यात यंदाच्या खरीपासाठी सात लाख २८ हजार हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी साडे चार लाख हेक्टर क्षेत्रात सद्यस्थितीत पेरणी झाली आहे. यामध्ये चांदुररेल्वे तालुक्यात ३६,२३८ हेक्टर, तिवसा ३५ हजार ११३, मोर्शी ४३,१२०, वरूड ३५ हजार ९६७, दर्यापूर १६, ५३१, धारणी ३८,५६२, चिखलदरा १०,०७५, अमरावती ५१,४७०, भातकुली ३६,४८१, नांदगाव खं.५२,७७०, अंजनगाव सुर्जी ३,९००, अचलपूर १५,६९४, चांदुरबाजार ४४,९५०, धामणगाव रेल्वे ३१,८५३ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली.
असे आहे संभाव्य दुबार पेरणी क्षेत्र
जिल्ह्यात दीड ते दोन लाख हेक्टर क्षेत्रात दुबार पेरणीचे सावट आहे. यामध्ये अमरावती तालुक्यात १५ ते १८ हजार हेक्टर, मोर्शी तालुक्यात १७ ते २० हजार हेक्टर, भातकुली तालुक्यात ११ ते १३ हजार हेक्टर, चांदुरबाजार तालुक्यात ३३ ते ३५ हजार हेक्टर, धारणी तालुक्यात चार ते सहा हजार हेक्टर क्षेत्रात दुबार पेरणीची शक्यता आहे. उर्वरीत तालुक्यातील माहिती उपलब्ध नसली तरी पेरणीपैकी ५० ते ६० टक्के क्षेत्रात दुबार पेरणीचे संकट कायम आहे. पावसाच्या प्रतीक्षेत बळीराजा असला तरी हुलकावणीशिवाय काही नाही हे खरे आहे.
पावसाचा ताण असल्यामुळे जिल्ह्यात किमान ६० ते ७० हजार हेक्टर संभाव्य दुबार पेरणीचे क्षेत्र असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. क्षेत्रीय कर्मचारी संपावर असल्याने काही प्रमाणात अडचण आहे.
- अनिल खर्चान उपसंचालक, कृषी