आंतरराज्यीय इराणी टोळीचा सदस्य एलसीबीच्या जाळ्यात; तोतया पोलीस बनून केली होती वाटमारी

By प्रदीप भाकरे | Published: November 3, 2022 05:10 PM2022-11-03T17:10:48+5:302022-11-03T17:11:14+5:30

खऱ्या पोलिसांकडून खोट्या पोलिसाला मध्य प्रदेशमधून अटक

Interstate Iranian gang member arrested by LCB whom robbed an old man in Warud by pretending to be a policeman | आंतरराज्यीय इराणी टोळीचा सदस्य एलसीबीच्या जाळ्यात; तोतया पोलीस बनून केली होती वाटमारी

आंतरराज्यीय इराणी टोळीचा सदस्य एलसीबीच्या जाळ्यात; तोतया पोलीस बनून केली होती वाटमारी

Next

अमरावती : क्राइम ब्रँचमधील पोलीस असल्याची बतावणी करून वरूड येथील एका वृद्धाला लुटणाऱ्या तोतया पोलिसाला खऱ्या क्राइम ब्रॅचने बीडमधून जेरबंद केले. हसनी अली ऊर्फ आजम अली इराणी (३२, रा. इराणी मोहल्ला, शिवाजीनगर, परळी वैजनाथ, बीड) असे अटक आरोेपीचे नाव आहे. तपासादरम्यान, तो आंतरराज्यीय इराणी टोळीचा सदस्य असल्याचे स्पष्ट झाले असून, त्याने वरूड येथील घटनेची कबुली दिली आहे. ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने त्याला मध्य प्रदेशातील रिवा शहरातून अटक केली.

वरूड ठाण्याच्या हद्दीतील झोलंबा येथील सुभाष बद्रे (६७) हे ३० सप्टेंबर रोजी वरूड येथून बाजार करून परतत असताना बाजारात दुचाकीहून आलेल्या तिघा-चौघांनी त्यांना आम्ही क्राइम ब्रँचचे पोलीस असल्याचे सांगितले. समोर खून झाला असून, लूटमार सुरू असल्याची बतावणी करून त्यांच्याकडील ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी हातचलाखीने काढून घेतली आणि घटनास्थळावरून पसार झाले. याबाबत वरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सबब, पोलीस अधीक्षकांनी तो गुन्हा उघडकीस आणण्याचे निर्देश स्थानिक गुन्हे शाखेला दिले.

दरम्यान, त्या प्रकरणातील आरोपी हा वयोवृद्धांना लुटणाऱ्या आंतरराज्यीय इराणी टोळीतील सदस्य असून, तो मूळचा परळी वैजनाथ येथील असल्याची माहिती एलसीबीला मिळाली. तो मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये राहत असल्याच्या माहितीवरून त्याचा भोपाळसह अन्य राज्यातदेखील मागमूस घेण्यात आला. दरम्यान, तो मध्य प्रदेशातील रिवा येथे असल्याची पक्की माहिती एलसीबीला मिळाली. २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास त्याला अटक करण्यात आली. एलसीबीच्या पथकाने त्वरेने ६५० किमी अंतर गाठत हसनी अली ऊर्फ खुराक आजम अली याला ताब्यात घेण्यात आले, तर अन्य आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

अशी झाली जप्ती

आरोपीकडून वरूड येथे वाटमारी करतेवेळी वापरलेली दुचाकी, दिल्ली क्राइम ब्रँचचे पोलीस म्हणून असलेले बनावट ओळखपत्र, मोबाइल असा एकूण ९३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्याला वरूड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक नितीन चुलपार, अंमलदार संतोष मुंदाने, रवींद्र बावने, दीपक सोनाळेकर, पंकज फाटे, दिनेश कनोजिया, कमलेश पाचपोर यांनी ही कारवाई केली.

Web Title: Interstate Iranian gang member arrested by LCB whom robbed an old man in Warud by pretending to be a policeman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.