अमरावती विद्यापीठात एक कोटी नियमबाह्य वेतन देण्याचा डाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:14 AM2021-04-09T04:14:18+5:302021-04-09T04:14:18+5:30
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने अधिष्ठातापदी सेवानिवृत्त प्राचार्य एफ. सी. रघुवंशी यांची २० मे २०१९ रोजी नियमबाह्य नियुक्ती ...
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने अधिष्ठातापदी सेवानिवृत्त प्राचार्य एफ. सी. रघुवंशी यांची २० मे २०१९ रोजी नियमबाह्य नियुक्ती केली. आता या नियमबाह्य पदासाठी तब्बल एक कोटी रुपये वेतन देण्याचा डाव रचण्यात आला आहे. त्याअनुषंगाने शुक्रवारी आयोजित व्यवस्थापन परिषदेत रघुवंशी यांना जनरल फंडातून वेतन अदा करण्याचा निर्णय होणार असल्याची माहिती आहे.
व्यवस्थापन परिषदेत ॲटम क्रमांक ६० अन्वये प्राचार्य पदावरील सेवाखंड क्षमापित करून व वेतन संरक्षित करून रुज़ू दिनांकापासून वेतन अदा करण्याबाबत हा विषय निर्णयासाठी ठेवण्यात आला आहे. विद्यापीठाने विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठातापदी सेवानिवृत्त प्राचार्य एफ.सी. रघुवंशी यांची नियुक्ती केली. मात्र, अधिष्ठातापदी नियुक्त करायचे असल्यास ती व्यक्ती प्राचार्यपदी नियुक्त असणे अनिवार्य आहे. मात्र, रघुवंशी यांनी नेमके कसे राजकारण फिरविले आणि अधिष्ठातापदी नियुक्ती करवून घेतली. रघुवंशी यांच्या अधिष्ठातापदाच्या मुलाखतवेळी अमरावतीचे तत्कालीन उच्च शिक्षण सहसंचालक संजय जगताप यांनी ऑब्जेक्शन नोंदविले होते. मात्र, अमरावती विद्यापीठात ‘परिवार’मुळे जगताप यांचे काहीही चालले नाही. मध्यंतरी विद्यापीठाने अधिष्ठाता रघुवंशी यांच्या वेतनाबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला होता. मात्र, शासनाने तो नामंजूर केला. त्यामुळे आता विद्यापीठ प्रशासनाने अधिष्ठाता रघुवंशी यांचे वेतन जनरल फंडातून काढण्याचा डाव रचला आहे. जनरल फंडात पैसा हा विद्यार्थी, परीक्षा शुल्क आदींमधून जमा होतो. त्यामुळे विद्यापीठात अनागोंदी कारभार सुरू असल्याचे स्पष्ट होते. शुक्रवारी होऊ घातलेल्या व्यवस्थापन परिषदेत अधिष्ठाता रघुवंशी यांच्या वेतनाबाबत नेमका काय निर्णय होते, याकडे लक्ष लागले आहे. यासंदर्भात कुलगुरू मुरलीधर चांदेकर, कुलसचिव तुषार देशमुख यांच्या लोकमतने संपर्क साधला असता, ते उपलब्ध होऊ शकले नाही.