अवैध होर्डिंग्ज, फ्लेक्स् हटवा अन्यथा फौजदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 10:30 PM2019-03-01T22:30:21+5:302019-03-01T22:30:44+5:30
महानगरात विनापरवानगीने लावण्यात येणारे होर्डिंग्ज, फ्लेक्स आणि बॅनर हटवा अन्यथा संबंधितावर फौजदारी दाखल करा, असे थेट आदेश महापालिका आयुक्तांनी शहर विद्रुपीकरणाबाबत शुक्रवारी घेतलेल्या बैठकीतून दिले. यासंदर्भात महापालिकेत शनिवारी राजकीय पक्षाचे शहर प्रमुख, प्रिन्टींग संचालकांची बैठक बोलावण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महानगरात विनापरवानगीने लावण्यात येणारे होर्डिंग्ज, फ्लेक्स आणि बॅनर हटवा अन्यथा संबंधितावर फौजदारी दाखल करा, असे थेट आदेश महापालिका आयुक्तांनी शहर विद्रुपीकरणाबाबत शुक्रवारी घेतलेल्या बैठकीतून दिले. यासंदर्भात महापालिकेत शनिवारी राजकीय पक्षाचे शहर प्रमुख, प्रिन्टींग संचालकांची बैठक बोलावण्यात आली आहे.
‘लोकमत’ने अवैध होर्डिग्ज, फ्लेक्स चौकाचौकात असल्याबाबत छायाचित्रणांसह वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत महापालिका प्रशासनाने २८ फेब्रुवारी रोजी रात्री ११ ते ३ वाजेदरम्यान अवैध फ्लेक्स, होर्डिंग्ज, बॅनर हटविण्याची कारवाई केली. शुक्रवारी पुन्हा या पथकाने दुपारी १२ वाजेपासून हीच कारवाई निरंतरपणे सुरू ठेवली. यात शहरातील ७५ होर्डिग्ज, फ्लेक्स, बॅनर हटविण्यात आले. प्रकाशकाच्या नावाशिवाय मजकूर प्रसिद्ध होता कामा नये. महापालिका बाजार व परवाना विभागाच्या परवान्याशिवाय होर्डिग्ज, फ्लेक्स, बॅनर लागणार नाही. स्टॅबिलिटी प्रमाणपत्रावर अभियंत्याची स्वाक्षरी अनिवार्य राहील, असे निर्देश आयुक्तांनी दिले. कारवाईत रामदास वाकपांजर, उदय चव्हाण, मनोज इटनकर, शेखर ताकपिरे, नितीन शेंडे, शुभम चोमळे, आनंद काशीकर, प्रवीण इंगोले आदींनी सहभाग घेतला.