पोलीस निरीक्षकाच्या आशीर्वादाने शहरात रेतीची अवैध वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2017 12:03 AM2017-05-14T00:03:16+5:302017-05-14T00:03:16+5:30
वाहतूक शाखेच्या एका पोलीस निरीक्षकाच्या आशीर्वादाने शहरात रेतीची अवैध वाहतूक सुरू असल्याचा गंभीर प्रकार पुढे आला आहे.
पोलीस आयुक्तांची दखल : चौकशीअंती थेट होणार कारवाई
अमरावती : वाहतूक शाखेच्या एका पोलीस निरीक्षकाच्या आशीर्वादाने शहरात रेतीची अवैध वाहतूक सुरू असल्याचा गंभीर प्रकार पुढे आला आहे. यासंदर्भात पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी गंभीर दखल घेतली असून संबंधित अधिकाऱ्याच्या चौकशीनंतर थेट कारवाई होण्याची शक्यता आहे.
पंचवटी चौकात गुरुवारी एका पोलीस उपनिरीक्षकासह चार पोलीस कर्मचाऱ्यांनी नाकाबंदीदरम्यान एमएच ०४-डीडी-१४९५ या ट्रकला पकडले. यावेळी २ ब्रास रेती वाहतुकीची परवानगी असताना ट्रकमधून चार ब्रास रेती वाहून नेली जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे पोलीस ट्रकचालकाला ताब्यात घेऊन वाहतूक शाखेत ट्रक जमा केला. ट्रकचालक मो.शफी शेख इस्माईल (५५,रा.अन्सारनगर) याने ट्रक सोडण्याचा प्रयत्न केला.मात्र दंड भरून ट्रक सोडण्याचे पोलीस कर्मचारी दिलीप रत्नपारखी यांनी सांगितले.
पोलिसांचे अभय
अमरावती : ट्रक चालकाने आमच्या ट्रकचे पोलिसांच्या यादीत नाव असून मालकाकडून रेती वाहतुकीसाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पैसै दिले जाते. त्यामुळे ट्रक थांबविण्याचा प्रश्नच उरत नाही, असे ट्रकचालकाने पोलीस कर्मचाऱ्यांना सांगितले. रत्नपारखी यांनी ट्रकवर दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली. ट्रक चालकाने गाडग ेनगरचे पोलीस निरीक्षक नागे यांच्याशी भ्रमणध्वीवर संपर्क करून त्यांना वाहतूक शाखेच्या कार्यालयात येण्यास सांगितले.ट्रकचालकाच्या बोलण्यावरून पीआय नागे हे उशिरा रात्री वाहतूक शाखा गाठून तत्काळ ट्रक चालकाला २०० रुपये चलान देऊन ट्रक घेऊन जाण्यास सांगितले. हा प्रकार बघता पोलिसांच्या साठगाठीमुळेच शहरात रेतीची अवैध वाहतूक सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे. पोलिसांच्या आशीर्वादानेच शहरात रेती तस्कर तोंड वर काढत असल्याचा आरोप आहे. हा गंभीर प्रकार पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्या निदर्शनास आला आहे.
शासनाचा बुडतोय महसूल
शहरातून अवैध रेती वाहतूक होत असल्यामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणात महसुल बुडत आहे. एकीकडे तहसील कार्यालयामार्फत रेती तस्करांवर वॉच ठेवल्या जात आहे. दुसरीकडे बिनभोटपणे पोलीस रेती तस्करांना मुभा देत आहे. या प्रकारामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसुल बुडत आहे. त्यातच अनेकदा रेती माफीया शिरजोर बनून तहसील मार्फत होणाऱ्या कारवाईचा विरोध करून हल्ले सुध्दा करताना आढळून आले आहे.
रेतीच्या अवैध वाहतुकीस पाठबळ देणाऱ्या पोलिसांची माहिती मागविली आहे. चौकशीअंती थेट कारवाई करण्यात येईल.
- दत्तात्रय मंडलिक, पोलीस आयुक्त.