रेल्वे वॅगन प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घ्या
By admin | Published: January 19, 2017 12:06 AM2017-01-19T00:06:39+5:302017-01-19T00:06:39+5:30
बडनेरा पाचबंगला परिसरातील निर्माणाधिन रेल्वे वॅगन दुरूस्ती कारखान्यासाठी जमिनी देणाऱ्या प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबातील प्रत्येकी एका सदस्याला रेल्वेने नोकरीत सामावून घ्यावे, ...
रवि राणांची मागणी : मध्यरेल्वेच्या महाप्रबंधकांना साकडे, उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवा
अमरावती : बडनेरा पाचबंगला परिसरातील निर्माणाधिन रेल्वे वॅगन दुरूस्ती कारखान्यासाठी जमिनी देणाऱ्या प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबातील प्रत्येकी एका सदस्याला रेल्वेने नोकरीत सामावून घ्यावे, अशी मागणी आ.रवि राणा यांनी केली आहे. मागील आठवड्यात प्रकल्पग्रस्तांसमवेत आ. राणांनी मध्यरेल्वे मुंबईच्या महाप्रबंधकांची भेट घेऊन ही मागणी रेटून धरली.
रेल्वे वॅगन दुरूस्ती कारखान्यासाठी बडनेऱ्यातील शेतकऱ्यांची सुपीक जमीन अधिग्रहित केली आहे. तुलनेत अत्यल्प मोबदला मिळाल्याचा आक्षेप प्रकल्पग्रस्तांनी घेतला आहे. प्रकल्पाचे काम सुरु झाले आहे. ४५ प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबातील प्रत्येकी एका सदस्याला रेल्वेने नोकरीत सामावून घेतल्यास त्यांना उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध होईल, ही बाब आ. राणा यांनी महाप्रबंधक डी.के.शर्मा यांच्या समक्ष ठेवली. प्रकल्पग्रस्तांची व्यथा जाणून घेतल्यानंतर मध्यरेल्वे मुंबईचे महाप्रबंधक शर्मा यांनी रेल्वेमंत्री प्रभू यांच्यासोबत बैठक घेतली व लवकरच यावर तोडगा काढण्याचे आश्वासन आ. राणांना दिले. प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी वॅगन दुरूस्ती कारखान्यासाठी ताब्यात घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांजवळ उदरनिर्वाहाचे साधन नाही. काही प्रकल्पग्रस्तांना मिळालेल्या जमिनीची मोबदल्याची रक्कम संपली आहे.विविध समस्यांनी प्रकल्पग्रस्त ग्रासले आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांना दिलासा देण्यासाठी कुुटुंबातील एका सदस्याला नोकरीत सामावून घेतले तर न्याय मिळेल, असे आ.राणांनी रेल्वे अधिकाऱ्यांना पटवून दिले. यावेळी रेल्वेचे मुख्य बांधकाम अभियंता एस.के. श्रीवास्तव, गणेश भोयर, कृष्णराव शेगोकार, सुनील तऱ्हेकर, सोना गद्रे, धमेंद्र कारेगोरे, अतुल तऱ्हेकर, नीलेश शेगोकार, माणिक वडनेकर, राजू तायडे, मोहन दुबे, तैय्यब भाई, रुपचंद खंडेलवाल, सैफी गडगडेश्वर आदी उपस्थित होते.