तिरुपती टॉवरमध्ये ‘आयपीएल’वर सट्टा
By admin | Published: April 21, 2017 12:15 AM2017-04-21T00:15:10+5:302017-04-21T00:15:10+5:30
स्थानिक अंबादेवी रस्त्यावरील तिरूपती टॉवर्समध्ये सुरू असलेल्या सट्यावर धाड घालून पोलिसांनी १.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
१.८७ लाखांचा ऐवज जप्त : हुक्कापार्लरही बेकायदेशीर
अमरावती : स्थानिक अंबादेवी रस्त्यावरील तिरूपती टॉवर्समध्ये सुरू असलेल्या सट्यावर धाड घालून पोलिसांनी १.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याच ठिकाणी बेकायदेशीररीत्या हुक्का पार्लर चालविण्यात येत असल्याची धक्कादायक बाब कारवाईदरम्यान उघड झाली. सध्या सुरू असलेल्या आयपीएलमधील दिल्ली डेअर डेव्हिल्स आणि सनराईजर्स हैद्राबाद या संघात झालेल्या लढतीवर सट्टा लावला जात होता. ९ सट्टेबाजांना अटक करण्यात आली. त्यात दोन अल्पवयीनांचा समावेश आहे.
तिरूपती टॉवरस्थित ‘हॉटपॉट कॅफे’मध्ये अवैधरीत्या हुक्का पार्लर चालविले जात असल्याच्या माहितीवरून गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी सायंकाळी येथे धाड टाकली. यात पार्लरचा मालक मोहनीश माखिजा आणि विक्की आसाणी हे सध्या सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट टी-२० मालिकेतील दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि सनराईजर्स हैद्राबाद यासंघांच्या लढतीवर सट्टा लावत असल्याचे उघड झाले. बॉलवर रक्कम लावून जुगार खेळला जात असल्याचे सिद्ध झाल्यानंतर ९ जणांना ताब्यात घेण्यात आले. पार्लरमध्ये काही व्यक्ती हुक्का पीत असल्याचे लक्षात आल्यानंतर परवान्याची मागणी करण्यात आली. मात्र, संबंधित आरोपी कुठलाही परवाना दाखऊ शकले नाहीत. विक्की गोपीचंद आसाणी आणि मोहनीश माखिजा हे ‘हॉटपॉट कॅफे’चे मालक असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून आरोपी बेकायदेशिररित्या हुक्कापार्लर चालविण्याबरोबरच आयपीएलवर सट्टा खेळत असल्याची बाब उघड झाल्याने आरोपींकडून १ लाख ८७ हजार १८५ रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. याशिवाय घटनास्थळावरून हुक्का ओढण्याकरीता वापरण्यात येत असलेले हुक्कापात्र हस्तगत करण्यात आले. आरोपींविरूद्ध जुगार प्रतिबंधक कायदा सहकलम ३३ (डब्ल्यू) (अ) महाराष्ट्र पोलीस कायदा सहकलम १८८, भादंविच्या सहकलम ४,२१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
हे आहेत आरोपी
रोहित रुद्र विश्वकर्मा रविनगर, अनिकेत रमेश कापडिया (श्री कॉलनी), विक्की गोपीचंद आसाणी (कृष्णानगर), संदीप गोपीचंद आसाणी (कृष्णानगर), संतोष दौलतराम जैसवाणी (रामपुरी कॅम्प), लखन मेघानी, मोहनिष माखिजा.