आयपीएल सट्ट्याचे ‘एमपी’ कनेक्शन
By admin | Published: May 15, 2017 12:02 AM2017-05-15T00:02:30+5:302017-05-15T00:02:30+5:30
शहरात क्रिकेट सट्ट्याचे जाळे पसरल्याचे अलिकडे पोलीस कारवाईवरून निदर्शनास येते.
कोट्यवधींची उलाढाल : हुक्का पार्लरमधूनही सट्टा व्यवसाय
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरात क्रिकेट सट्ट्याचे जाळे पसरल्याचे अलिकडे पोलीस कारवाईवरून निदर्शनास येते. मात्र, क्रिकेट सट्ट्याच्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोलीस अद्याप पोहोचले नाहीत. शहरात क्रिकेट सट्टा चालविणारा बुकी मध्यप्रदेशातील असून तो शहरात राहून क्रिकेटचा सट्टा चालवित असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
कोट्यवधीची उलाढाल असलेल्या क्रिक्रेटच्या सट्ट्यामुळे वरली-मटक्यासह जुगारावर मोठा परिणाम झाला आहे. जुना कॉटन मार्केट परिसरातील होटल आदर्श व शेगाव-रहाटगांव मार्गावरील चौधरी ढाब्यावर धाड टाकून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी रात्री नऊ युवकांना आयपीएल क्रिकेट सट्टा खेळताना रंगेहात अटक केली. त्यांच्याजवळून १ लाख ७५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. हे आरोपी हा सट्टा कोणत्या बुकीजवळ लावत होते, ही बाब अद्याप स्पष्ट झाली नाही. आरोपींजवळून जप्त केलेल्या मोबाईलच्या आधारे चौकशी सुरू केली आहे. आरोपी कोणाच्या संपर्कात आहेत, ही बाब पोलीस तपासून पाहात आहेत. मात्र, क्रिकेट सट्ट्याचा थेट संबंध मध्यप्रदेशातील एका व्यक्तीशी असल्याची माहिती आहे. मध्यप्रदेशातील एक व्यक्ती बुकी म्हणून क्रिकेट सट्ट्याचे पैसे गोळा करतो. तो अमरावतीत राहून हा सट्टा चालवित असल्याची सुद्धा चर्चा आहे. मागील काही प्रकरणांमध्ये क्रिकेट सट्ट्यातील आरोपींचे मोबाईल ट्रेस केले असता त्यामध्ये काहींचे मोबाईल क्रमांक मृत किंवा पारधी नागरिकांशी जुळल्याचे आढळून आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. त्यामुळे याक्रिकेट सट्ट्याचा मध्यप्रदेशातील व्यक्तीशी संबध असल्याची कुणकुण पोलिसांना लागली आहे.
वरली,मटका जुगारावर परिणाम
आयपीएल क्रिक्रेटच्या मॅचमध्ये सट्टा लावण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात छुप्या मार्गाने हे धंदे फोफावत आहेत. जुगार व वरली-मटका व्यवसायावर वारंवार धाडी टाकल्या जात असल्याने पर्यायी मार्ग म्हणून लब्धप्रतिष्ठांनी असे प्रताप सुरु केले आहेत. परिणामी वरली, मटक्यासह जुगार खेळण्याची संख्या कमी झाली असून क्रिकेट सट्ट्याचे आकर्षण वाढले आहे. जुगार व वरली-मटका व्यवसाय करणाऱ्यांनी ही माहिती पोलिसांना दिली आहे.
सीडीआर मागविणार
क्रिकेट सट्टा प्रकरणातील आरोपी हे लब्धप्रतिष्ठित असून ते लाखो रुपयांचा सट्टा लावत होते. हा सट्टा लावताना ते कोणाच्या मोबाईलवर संपर्क करीत होते, ही माहिती काढण्यासाठी पोलीस आरोपींच्या मोबाईलचा सीडीआर मागविणार आहेत.
आरोपींचे मोबाईल जप्त करण्यात आले असून त्याद्वारे त्यांनी कोणाकोणाशी संपर्क साधला, हे तपासून पाहावे लागणार आहे. त्यासाठी सीडीआर मागविण्यात येईल.
- प्रमेश आत्राम, पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा.