विद्यापीठाची संलग्नता नसलेल्या महाविद्यालयात नियमबाह्य प्रवेश; एमएस्सी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी त्रस्त
By गणेश वासनिक | Published: February 6, 2023 02:19 PM2023-02-06T14:19:58+5:302023-02-06T14:20:31+5:30
महाविद्यालयास न्यायालयाचा दणका, अधिकारी करताहेत महाविद्यालयाची भलामण
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावतीविद्यापीठाची एमएस्सी अभ्यासक्रमाला संलग्नता नसताना बुलढाणा जिल्ह्यात जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथे बापूमिया सिराजोद्दीन पटेल महाविद्यालयाने ५० विद्यार्थ्यांना नियमबाह्य प्रवेश दिल्याचा धक्कादायक प्रकार निदर्शनास आला आहे. मात्र, आता या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधातरी असून, विद्यार्थी न्यायासाठी दारोदार भटकंती करीत आहे.
महाविद्यालयाने संलग्नता नसताना एमएस्सी पदव्युत्तर प्रवेश रद्द ठरवले असून परीक्षा आली असताना प्रवेश रद्द झाल्याने विद्यार्थी संतापले आहेत. तर विद्यापीठातील काही उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना हाताशी धरून संचालक मात्र विद्यार्थ्यांना आशा दाखवत आहेत. दरम्यान समितीचा अहवाल व महाविद्यालयाचे उत्तर नियमानुसार विद्यापरिषदेसमोर सादर करावा लागेल, त्यामुळे प्रवेश देऊ नका असे उपकुलसचिवांनी अगोदरच बी.एस. पटेल महाविद्यालयास कळविले आहे. आता न्यायालयाने विद्यापीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार देऊन विद्यापीठ कायदा कलम ११० (५) शी विपरीत कार्यवाही अयोग्य असल्याचा निवार्ळा दिला असून संलग्नता नसताना केलेले सर्व प्रवेश अवैध असल्याची बाब अधोरेखीत केली आहे.
काय आहे प्रकरण ?
बुलढाणा जिल्ह्यात जळगाव जामोद तालुक्यात पिंपळगाव काळे या छोटेखानी गावात बापूमिया सिराजोद्दीन पटेल महाविद्यालय नावाचे कला वाणिज्य महाविद्यालय आहे. दुरदुरचे अनेक विद्यार्थी मनमानी शुल्क असले तरी सहजतेने उत्तीर्ण होता येत असल्याने येथे प्रवेश घेतात. हे महाविद्यालय बरेच दूर असल्याने विद्यापीठ प्राधिकारणीचे सदस्य कधीही इकडे फिरकत नाहीत. चुकून एखादा अधिकारी अथवा सदस्य परीक्षेदरम्यान गेला तर त्याला " मॅनेज " करण्याची किमया महाविद्यालयाकडे आहे.
समितीने संलग्नता नाकारली
एप्रिल २०२२ मध्ये या महाविद्यालयाने विज्ञान, कला, वाणिज्य विषयात पदव्युतर अभ्यासक्रमाच्या संलग्नतेसाठी अर्ज दाखल केला. दरम्यान ऑगस्ट महिन्यात शासनाची मान्यता आणली. विद्यापीठाच्या नियमानुसार सप्टेबर २०२२ मधे विद्यापीठाने महाविद्यालयाची पाहणी करण्यासाठी पाच सदस्यीय चमू पाठवली. विद्यापीठाचे डॉ प्रशांत गावंडे या समितीचे अध्यक्ष होते. महाविद्यालयातील अपुऱ्या व्यवस्था व कागदपत्रांची पूर्तता न केल्याने समितीने संलग्नता नाकारली.
बापुमिया पटेल महाविद्यालयातील एमएस्सी अभ्यासक्रमाला विद्यापीठाची संलग्नता नाही. यासंदर्भात विद्यापीठाच्या बाजुने उच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. त्यामुळे एमएस्सी अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांचे प्रवेश हे नियमबाह्यच आहे.
- तुषार देशमुख, कुलसचिव, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ.