बीएसएनएलची अनियमित सेवा
By admin | Published: October 13, 2014 11:15 PM2014-10-13T23:15:54+5:302014-10-13T23:15:54+5:30
दूरसंचार क्षेत्रात शासकीय सेवा म्हणून काम करणाऱ्या बीएसएनएल कंपनीला ग्राहकांकडून चांगली मागणी आहे. परंतु चांदूरबाजार तालुक्यात काही दिवसांपासून ही सेवा विस्कळीत झाली आहे.
चांदूरबाजार : दूरसंचार क्षेत्रात शासकीय सेवा म्हणून काम करणाऱ्या बीएसएनएल कंपनीला ग्राहकांकडून चांगली मागणी आहे. परंतु चांदूरबाजार तालुक्यात काही दिवसांपासून ही सेवा विस्कळीत झाली आहे. मोबाईल सेवेत अनेक अडथळे येत असून इंटरनेट सेवेचीही तीच गत झाली आहे. त्यामुळे बीएसएनएल सेवा अनियमित झाली आहे.
दूरसंचार क्षेत्रात मोठे संशोधन झाल्याने दिवसेंदिवस ही सेवा 'अपडेट' होते आहे. या क्षेत्रात बीएसएनएलसह अनेक खासगी कंपन्यादेखील काम करीत आहेत. त्यामुळे या क्षेत्रात मोठी स्पर्धा आहे. म्हणून बीएसएनएलसह खासगी कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक योजना कार्यान्वित करीत आहेत. मोबाईलच्या ब्रॉडबँड, लॅन्डलाईन सुविधा फक्त बीएसएनएल कंपनीकडेच असल्याने साहजिकच या कंपनीकडे मोठा ग्राहक वर्ग जुळला आहे. त्याचप्रमाणे बीएसएनएल कंपनी ही शासकीय कंपनी असल्याने विश्वासार्हता व आपुलकी म्हणून ग्राहकांचा ओढा या कंपनीकडे जास्त होती. म्हणून चांदूरबाजार तालुक्यात बीएसएनएल कंपनीकडेच मोठ्या प्रमाणात ग्राहक संख्या आहे.
सध्या इंटरनेट ही अशी आवश्यक सेवा झाली आहे. त्यामुळे या क्षेत्रात विविध कंपन्यांत मोठी स्पर्धा सुरू आहे. जास्तीत जास्त ग्राहक आपल्या कंपनीकडे यावे याकरिता खासगी कंपन्यांकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध सोईसुविधा व सवलती देण्यात येत आहेत. या तुलनेत बीएसएनएलकडून ग्राहकांना सोई व सुविधा अपुऱ्या पडत असल्याने दिवसेंदिवस ग्राहकसंख्या रोडावत चालली आहे. चांदूरबाजार तालुक्यात तसेच शहरात अजूनही बीएसएनएलची इंटरनेट सेवासुद्धा व्यवस्थित मिळत नाही. अनेकदा शनिवार व रविवारी इंटरनेट कनेक्ट होतच नाही. तसेच इंटरनेट कनेक्ट झाल्यानंतर वारंवार बंद पडते. इंटरनेटची गतीसुद्धा इतर कंपन्यांच्या तुलनेत ढिम्म आहे. लॅन्डलाईन सेवा देखील वारंवार खंडित होत असते. याबाबत ग्राहकांनी संबंधित कार्यालयात तक्रार केल्यानंतरही त्या तक्रारीची दखल घेतली जात नाही, अशी अनेक ग्राहकांची तक्रारी आहे. तसेच बीएसएनएलचे वरिष्ठ अधिकारी कारवाई करणार काय? चांदूरबाजार येथील बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना वरिष्ठांकडूनच अभय देण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. (तालुका प्रतिनिधी)