मुख्य पाईपलाईनमधून दूषित पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 12:10 AM2017-07-18T00:10:42+5:302017-07-18T00:10:42+5:30

अंजनगाव सुर्जी व अचलपूर तालुक्याच्या सीमेवरील शहानूर धरणातून पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा केला जातो.

Irregular water supply from the main pipeline | मुख्य पाईपलाईनमधून दूषित पाणीपुरवठा

मुख्य पाईपलाईनमधून दूषित पाणीपुरवठा

Next

जीवन प्राधिकरणचे अक्षम्य दुर्लक्ष : नागरिकांच्या आरोेग्याशी खेळ
लोकमत न्यूज नेटवर्क
अंजनगाव सुर्जी : अंजनगाव सुर्जी व अचलपूर तालुक्याच्या सीमेवरील शहानूर धरणातून पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र, आठ वर्षांपूर्वी टाकलेल्या पाईपलाईनच्या कामात भ्रष्टाचार झाल्याने सद्यस्थितीत या पाईपलाईनमधून ७९ गावांना पाणी पुरवठा केला जातो. या सर्वच गावांना दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे.
शहानूर धरण हे दर्यापूर-अंजनगाव सुर्जीसाठी वरदान ठरले आहे. अंजनगाव व सुर्जी हे जुळे शहर व ७९ खेडी, तर दर्यापूर शहर व १७९ खेड्यांमध्ये शहानूरमधून पाणीपुरवठा केला जातो. विना विद्युतपुरवठा ग्रामस्थांना पाणी मिळत असल्याने ग्रामस्थ आनंदी आहेत. परंतु त्याकाळात शहानूर धरणातून गावांना पाणीपुरवठा करण्याकरिता टाकण्यात आलेल्या पाईपलाईनचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. ही पाईपलाईन जमिनीच्या आत २ मीटर खोदकाम करून टाकण्याचे नमूद असताना केवळ एक ते दीड फूट अंतरावरच ही पाईपलाईन टाकण्यात आली आहे.
अलीकडेच शहरातील अंजनगाव सुर्जी - दर्यापूर या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असताना रस्त्याच्या बाजूला सांडपाण्याच्या गटाराचे काम करीत असताना या पाण्याची पाईपलाईन वरच असल्याचे दिसून आले. ही पाईपलाईन फुटलेली आढळली. त्यामध्ये घाण पाणी मिसळत आहे. मागील अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे समोर आले आहे.
याबाबतची माहिती मिळताच आ.रमेश बुंदिले, नगराध्यक्ष कमलकांत लाडोळे, वीज वितरण कंपनीचे सोनोने, पाणीपुरवठा विभागाचे पोकुलवार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाईपलाईनची पाहणी केली असता त्यांनाही हा गंभीर प्रकार दिसून आला. याबाबत, त्यांनी प्राधिकरणचे अभियंता सिनकर यांच्याशी संपर्क साधून विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. आमदार रमेश बुंदिले यांनी त्यांची खरडपट्टी काढून तत्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिलेत.

रोगराईला निमंत्रण
घाण पाणी पाईपलाईनमध्ये शिरून नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होण्याची बाब अतिशय गंभीर आहे. यामुळे विविध आजार बळावले असून नागरिकांच्या आरोग्याला धोका उत्पन्न झाला आहे. यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

Web Title: Irregular water supply from the main pipeline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.