‘फायर रेस्क्यू’ वाहन खरेदीतील अनियमितता मंत्रालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 10:33 PM2018-05-22T22:33:16+5:302018-05-22T22:34:17+5:30
तब्बल २ कोटी ४ लाख रुपये खर्च करून घेतलेल्या मल्टियूटिलिटी फायर रेस्क्यू वाहन खरेदीतील अनियमितता मंत्रालयात पोहोचली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी याबाबत अमरावती महापालिकेला तातडीने विस्तृत माहिती मागितली आहे. येत्या पावसाळी अधिवेशनात मुंडे याप्रकरणी चर्चा घडवून आणणार आहेत.
प्रदीप भाकरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : तब्बल २ कोटी ४ लाख रुपये खर्च करून घेतलेल्या मल्टियूटिलिटी फायर रेस्क्यू वाहन खरेदीतील अनियमितता मंत्रालयात पोहोचली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी याबाबत अमरावती महापालिकेला तातडीने विस्तृत माहिती मागितली आहे. येत्या पावसाळी अधिवेशनात मुंडे याप्रकरणी चर्चा घडवून आणणार आहेत.
धनंजय मुंडे यांनी २८ मार्च व ११ एप्रिल रोजी महापालिका आयुक्तांच्या नावे पत्र लिहून ही माहिती तात्काळ उलटटपाली किंवा ई-मेलवर उपलब्ध करून देण्यात यावी, असे या पत्रात नमूद केले आहे. विधिमंडळ कामकाजासाठी ही माहिती आपल्याला हवी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अग्निशमन यंत्रणेचे बळकटीकरण करण्यासाठी मल्टियूटिलिटी फायर रेस्क्यू वाहन खरेदी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. त्यानुसार मुंबईच्या निधी एंटरप्रायजेसला १७ आॅक्टोबर २०१७ ला पुरवठा आदेश देण्यात आला. वाहनाचा पुरवठा झाल्यानंतर १.९४ कोटी रुपये अदा करण्यात आले. दरम्यान, या रेस्क्यू वाहनाची किंमत बाजारभावानुसार ७० ते ८० लाख रुपये असताना २ कोटी ४ लाख २७ हजार ७०० रुपये किमतीवर आक्षेप घेण्यात आला.
पावसाळी अधिवेशनात चीरफाड
निधी एंटरप्रायजेससाठी ही निविदा प्रक्रिया मॅनेज करण्यात आली. त्यामुळे निविदा प्रक्रिया रद्द करून पुरवठा आदेश मागे घ्यावा, अशी मागणी वजा तक्रार मुख्यमंत्र्यांसह नगरविकास विभाग, लोकायुक्त, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाºयांकडे करण्यात आली. या सर्वांनी या प्रकरणाचा चौकशी अहवाल महापालिका आयुक्तांना मागितला. त्या पार्श्वभूमीवर मुंडे यांनी याबाबतची संपूर्ण माहिती मागितली. अमरावती महापालिकेच्या अग्निशमन विभागामार्फत मल्टियूटिलिटी फायर रेस्क्यू वाहन खरेदीत झालेल्या अनियमिततेबाबबत आपल्याकडे तक्रार प्राप्त झाली. त्याअनुषंगाने आपल्या विभागामार्फत करण्यात आलेली वा येत असलेल्या कार्यवाहीबाबतची संपूर्ण माहिती तसेच यासंदर्भात राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेबाबतची संपूर्ण माहिती तसेच विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांशी करण्यात आलेल्या पत्रव्यवहारांच्या छायांकित प्रती, या संदर्भातील प्राप्त चौकशी अहवाल व एकूणच या संदर्भातील संपूर्ण नस्तीची छायांकित प्रत उपलब्ध करून द्यावी, असे पत्र मुंडे यांनी अमरावती महापालिका आयुक्तांना पाठविले आहे. बाजारभावाची शहानिशा न करता कोट्यवधीचे हे वाहन घेतल्याच्या या संपूर्ण प्रकरणाची माहिती मुंडे यांनी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्ताच्या आधारे पूर्वीच घेतली आहे. अधिक माहिती मिळविण्यासाठी त्यांनी आयुक्तांशी पत्रव्यवहार केला आहे.
महापालिका प्रशासनाचा धश्चोटपणा
मल्टियूटिलिटी फायर रेस्क्यू वाहन खरेदीत कोट्यवधींची अनियमितता झाल्याची गंभीर तक्रार नगरविकास मंत्रालयासह लोकायुक्त व विधिमंडळाकडे करण्यात आली. मात्र, त्या तक्रारींची दखल न घेता किंवा तक्रारीत मुद्द्यांची चौकशी न करता निधी एंटरप्रायजेसला १.९४ कोटी रुपये देण्यात आले. रक्कम अदा केल्यानंतर ते वाहन सुधारणेसाठी पुन्हा कंपनीकडे पाठविण्यात आले. ते डिसेंबर १७ नंतर २१ मे २०१८ रोजी महापालिकेत दाखल झाले. त्या पार्श्वभूमीवर पुन्हा २१ मे रोजी याबाबत मुख्यमंत्र्यासह नगरविकास विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली. यात महापालिकेतील संबंधिताविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी आहे.
असे मिळले पत्र
धनंजय मुंडे यांनी महापालिकेला २८ मार्च रोजी पाठविलेले पत्र २५ एप्रिलला, तर ११ एप्रिलला पाठविलेले पत्र ४ मे रोजी मिळाले. पत्र प्राप्त होताच संपूर्ण माहिती जलद पाठविण्याचे निर्देश आयुक्त हेमंत पवार यांनी दिले. विशेष म्हणजे, पहिल्या पत्राचे उत्तर न मिळाल्याने मुंडे यांच्याकडून दुसऱ्यांदा पत्रव्यवहार करण्यात आला. यावरून विरोधी पक्षनेत्यांनी या प्रकरणातील अनियमितता अत्यंत गांभीर्याने घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
मल्टियूटिलिटी फायर रेस्क्यू वाहन खरेदीबाबत अनेक पातळ्यांवर तक्रारी झाल्यानंतरही कोट्यवधींचे देयक अदा करणे फारच गंभीर बाब आहे. पावसाळी अधिवेशनात हा विषय आपण प्रकर्षाने मांडणार असून, दोषींवर कारवाई करण्यास सरकारला भाग पाडू.
- धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेता, विधान परिषद