आॅनलाईन बदल्यांमध्ये अनियमितता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 10:15 PM2018-06-02T22:15:34+5:302018-06-02T22:15:34+5:30
जिल्हा परिषदेंतर्गत प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची आॅनलाईन प्रक्रिया याच आठवड्यात आटोपली. यामध्ये प्रचंड अनियमितता झाल्याचा आरोप करीत विस्थापित शिक्षक संघर्ष कृती समितीद्वाता त्वरित यादी दुरूस्तीची मागणी करीत प्रशासनाविरोधात एल्गार पुकारला. शनिवारी शेकडोच्या संख्येनी उपस्थित राहून पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांसह विभागीय आयुक्तांना निवेदन दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा परिषदेंतर्गत प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची आॅनलाईन प्रक्रिया याच आठवड्यात आटोपली. यामध्ये प्रचंड अनियमितता झाल्याचा आरोप करीत विस्थापित शिक्षक संघर्ष कृती समितीद्वाता त्वरित यादी दुरूस्तीची मागणी करीत प्रशासनाविरोधात एल्गार पुकारला. शनिवारी शेकडोच्या संख्येनी उपस्थित राहून पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांसह विभागीय आयुक्तांना निवेदन दिले.
आॅनलाईन बदल्यांमध्ये सर्व सवंर्गनिहाय याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या नाहीत. शिक्षकांच्या संवर्गनिहाय व शाळानिहाय रिक्त पदांची संख्या प्रसिद्ध केलेली नाही. अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन बदल्यांपूर्वी करण्यात आलेले नाही. आंतरजिल्हा बदलीने रिक्त झालेल्या जागा दाखविण्यात आलेल्या नाहीत. यामुळे बदली प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव जानवतो, असा आरोप कृती समितीने केला आहे. महिला शिक्षकांनी आधीच दुर्गम भागात सेवा दिलेली आहे. तरीसुद्धा दुर्गम भागात पाठविले आहे. यासह अनेक शासन नियमांचे उल्लंघन बदली प्रक्रियेत झाले आहे. शिक्षकांवर अन्याय करणारी अनावश्यक विस्थापना असल्यामुळे शिक्षकांनी या प्रक्रियेमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप केला. यामध्ये तत्काळ दुरूस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येऊन उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी विलास देशमुख, रवीकिरण सदानशिव, उमेश वाघ, रवींद्र यावले यांच्यासह शेकडो शिक्षक उपस्थित होते.