जिल्हा बँकेतील ३.३९ कोटींची अनियमितता ‘ईडी’च्या रडारवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:17 AM2021-08-19T04:17:31+5:302021-08-19T04:17:31+5:30
अमरावती : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील ३.३९ कोटींची आर्थिक अनियमितता सक्त वसुली संचालनालयाच्या अर्थात ईडीच्या रडारवर आली आहे. ईडीने ...
अमरावती : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील ३.३९ कोटींची आर्थिक अनियमितता सक्त वसुली संचालनालयाच्या अर्थात ईडीच्या रडारवर आली आहे. ईडीने या संपूर्ण अपहाराची माहिती मागविली आहे. याबाबत जिल्हा उपनिबंधकांना मंगळवारी पत्र प्राप्त झाले. बँकेचा लेखापरीक्षण अहवाल विनाविलंब ईडीच्या मुंबईस्थित कार्यालयाला पाठविण्याचे निर्देशदेखील देण्यात आले आहे.
जिल्हा बँकेने एका खासगी कंपनीत ७०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली. त्यात दलालीपोटी ३.३९ कोटी रुपये देण्यात आले. ही गुंतवणूक थेट बँकेकडून झाली असताना दलाली देणे कायदेसंगत नव्हते. त्यामुळे जिल्हा बँकेची ३.३९ कोटी रुपयांनी फसवणूक झाली, अशी तक्रार बँकेचे प्राधिकृत अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांनी १५ जून रोजी स्थानिक शहर कोतवाली पोलीस ठाण्यात नोंदविली होती. त्यांच्या तक्रारीवरून बँकेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह पाच बँक कर्मचारी, निप्पाॅन कंपनीचा स्थानिक व्यवस्थापक व पाच ब्रोकरविरूद्ध फसवणुक व गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. दुसऱ्याच दिवशी ते प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वळती करण्यात आले. याप्रकरणात आतापर्यंत कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. तर, दुसरीकडे सन २०१७ ते मार्च २०२१ या कालावधीतील बँकेच्या एकूणच व्यवहाराचे नागपूरस्थित एका संस्थेकडून फॉरेन्सिक ऑडिट केले जात आहे, तर ब्रोकर्सनी एफआयआर खारीज करण्यासह अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यापार्श्वभूमीवर सक्तवसुली संचालनालयाने जिल्हा उपनिबंधकांना या प्रकरणाची संपूर्ण माहिती मागविली आहे.
कोट
सक्तवसुली संचालनालयाच्या मुंबई कार्यालयाकडून मंगळवारी पत्र प्राप्त झाले. बँकेच्या लेखापरीक्षण अहवालासह संपूर्ण अनुषंगिक माहिती त्यांनी मागविली आहे.
- संदीप जाधव,
जिल्हा उपनिबंधक, अमरावती