विदर्भाचे मुख्यमंत्री, वित्तमंत्री असताना सिंचन प्रकल्प अपूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 10:48 PM2019-01-07T22:48:26+5:302019-01-07T22:49:59+5:30
विदर्भाचा मुख्यमंत्री, वित्तमंत्री तसेच सत्ताधारी शासनाचा आमदार असताना सिंचन प्रकल्प १२ वर्षांपासून अपूर्णावस्थेत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार गंभीर नसून, धनदांडगे आणि उद्योगपतींचे सरकार आहे. आ. बोंडे हे केवळ पक्षाची हुजरेगिरी करून शेतकºयांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आहे. सिंचनाचा प्रश्न सुटत नसेल तर आता काय वरूडचा मुख्यमंत्री द्यावा, असे खोचक विधान प्रहारचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांनी केले. ते पुसला येथे जिजामाता प्रांगणात आयोजित शेतकरी शेतमजूर आणि प्रकल्पग्रस्तांच्या दुष्काळ परिषदेत बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
वरुड : विदर्भाचा मुख्यमंत्री, वित्तमंत्री तसेच सत्ताधारी शासनाचा आमदार असताना सिंचन प्रकल्प १२ वर्षांपासून अपूर्णावस्थेत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार गंभीर नसून, धनदांडगे आणि उद्योगपतींचे सरकार आहे. आ. बोंडे हे केवळ पक्षाची हुजरेगिरी करून शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आहे. सिंचनाचा प्रश्न सुटत नसेल तर आता काय वरूडचा मुख्यमंत्री द्यावा, असे खोचक विधान प्रहारचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांनी केले. ते पुसला येथे जिजामाता प्रांगणात आयोजित शेतकरी शेतमजूर आणि प्रकल्पग्रस्तांच्या दुष्काळ परिषदेत बोलत होते.
वरूड तालुक्यातील सिंचनासह प्रकल्पग्रस्त, शेतकरी, शेतमजूरांचे प्रश्न कायम आहे. दोन वेळा संत्रा प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. पण वीटही लागली नाही. संत्रा, तुरीला हमी भाव द्या, म्हणजे शेतकऱ्यांचे भले होईल. केवळ गोष्टी करून चालणार नाही. नोकरदारांना सातवा वेतन आयोग दिला म्हणजे शेतकरी सुखी होईल, असे नाही. प्रहारचे केवळ पाच आमदार सभागृहात आलेत ना, तर मुख्यमंत्र्यांचा गणपती केल्याशिवाय राहणार नाही, यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकल्पग्रस्त समितीचे अध्यक्ष विजय श्रीराव, उदघाटक सरपंचा सारिका चिमोटे, महात्मा फुले बँकेचे अध्यक्ष राजेंद्र आंडे, शेतकरी नेते दिलीप भोयर, भाजपचे प्रभाकर काळे, राहुल देशमुख, प्रदीप कांबळे, प्रहारचे अनिल खांडेकर, राजश्री श्रीराव, गजानन डाहाके, लोकेश अग्रवाल, नगरसेवक मुन्ना तिवारी, उमेश दवंडे, सुनीता डाहाके, व्यापारी संघाचे अध्यक्ष अशोक देवते, माजी नगराध्यक्ष प्रशांत सावरकर, रवींद्र शेळके, शाहरुक सोदागर, राजू वरुडकर, सूरज धर्मे, नईम खान आदी व्यासपीठावर उपस्थित होते. सुरुवातीला महामानवांच्या प्रतिमेला हारार्पण करून चिखलदरा येथील बिहार रेजिमेंटचे जवान शहीद मुन्ना सेलूकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रास्ताविक समीर ठाकरे, तर संचालन विशाखा निकम आणि आभार मंगेश गजभिये यांनी मानले. दुष्काळी परिषदेला पंचक्रोशीतून हजारो शेतकरी, शेतमजूर उपस्थित होते.
बच्चू कडू यांच्या रॅलीला पुसल्यात उत्स्फूर्त प्रतिसाद
विजय श्रीराव यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचे नेते, प्रहारचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांची पुसला येथे रॅली काढण्यात आली. या रॅलीत हजारो ग्रामस्थांनी सहभागी होऊन कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.