इर्विनमधील डॉक्टरला मारहाण करणाऱ्या त्रिकुटाला दंडाची शिक्षा
By प्रदीप भाकरे | Published: October 4, 2023 05:55 PM2023-10-04T17:55:55+5:302023-10-04T17:57:04+5:30
१ एप्रिल २०१८ ची घटना : एकुण २७ हजार रुपयांचा दंड
अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालयामधील डॉक्टरला मारहाण करून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करण्याच्या प्रकरणात येथील तिघांना प्रत्येकी ९ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायाधीश (क्रमांक ५) ए. एस. आवटे यांच्या न्यायालयाने ४ ऑक्टोबर रोजी हा निर्णय दिला.
स्वप्निल प्रभाकर साव, पीयूष सुभाषराव वसू व अनिरुद्ध सुधाकर बोबडे (सर्व रा. अमरावती) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. न्यायालयीन दोषारोपपत्रानुसार, घटनेच्या दिवशी १ एप्रिल २०१८ रोजी रात्री डॉ. तारासिंग परशराम आडे हे जिल्हा सामान्य रूग्णालयात कर्तव्यावर होते. त्यावेळी रुग्णालयात दाखल एका रुग्णाचे नातेवाईक असलेले आरोपी हे डॉ. तारासिंग आडे यांच्याजवळ गेले. त्यांनी त्यांना रुग्णाची तपासणी करण्यास सांगितले. त्यावर डॉ. आडे यांनी कनिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्याला तपासणीसाठी पाठविले. दरम्यान, रुग्णाची प्रकृती बिघडल्याने त्यासाठी डॉ. आडे यांना जबाबदार धरत आरोपींनी त्यांना मारहाण केली. या प्रकरणी आडे यांच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाअंती आरोपपत्र दाखल केले.
सहा साक्षीदार तपासले
या प्रकरणात न्यायालयात सहा साक्षीदारांची साक्ष तपासण्यात आली. साक्षीदारांची साक्ष व सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने तिनही आरोपींना कलम ३३२ अन्वये प्रत्येकी ५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ५ महिने साधा कारावास, कलम ३५३ अन्वये प्रत्येकी ४ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ४ महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता सोनाली सुबोध क्षीरसागर यांनी युक्तीवाद केला. पैरवी अधिकारी म्हणून विजय वाठ व अरुण हटवार यांनी काम पाहिले.