मृतांचा मेमो पोलिसांना देण्यास इर्विनच्या कर्मचाऱ्यांची हयगय
By admin | Published: October 14, 2014 11:11 PM2014-10-14T23:11:06+5:302014-10-14T23:11:06+5:30
जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्याच्या माहितीचा मेमो पोलिसांपर्यंत पोहचविणे कर्मचाऱ्यांना आवश्यक असते. मात्र मेमो वेळेवर पोहचविण्यात कर्मचारी हयगय करतात.
अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्याच्या माहितीचा मेमो पोलिसांपर्यंत पोहचविणे कर्मचाऱ्यांना आवश्यक असते. मात्र मेमो वेळेवर पोहचविण्यात कर्मचारी हयगय करतात. अशाच घटनेत सोमवारी सायंकाळी एका महिलेच्या मृत्यूचा मेमो मंगळवारी सकाळी पोलिसांपर्यंत पोहचविण्यात आला. त्यामुळे मृताच्या नातेवाईकांना मृतदेह ताब्यात घेताना मोठा त्रास सहन करावा लागला आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्हाभरातील रुग्णांना आरोग्य सेवा पुरविली जाते. गोरगरीब नागरिक पैशा अभावी रुग्णालयात उपचाराकरिता येतात. मात्र योग्य आरोग्य सेवा पुरविण्यात रुग्णालयीन व्यवस्था अपुरी पडत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांकडे दुर्लक्ष होत आहे. अनेक वेळा नागरिकांनी व्यवस्था सुधारण्याचे प्रयत्नदेखील केले आहे. मात्र तात्पूरती व्यवस्था करुन प्रशासकीय अधिकारी रुग्णालयीन व्यवस्थेकडे दुर्लक्ष करीत आहेत. दररोज शेकडो रुग्ण विविध आजारांवर उपचार करण्याकरिता रुग्णालयात येतात. त्यामधील बहुतांश रुग्ण रुग्णालयात दाखलसुध्दा होतात. मात्र एखाद्या रुग्णांला डिस्चार्ज ध्यायचा असल्यास अथवा त्या रुग्णांचा मृत्यू झाल्यास पुढील प्रक्रिया करण्यात कर्मचारी हयगय करताना आढळुन येत आहे. नुकताच इर्विनच्या अतिदक्षता कक्षामध्ये शिला महादेव भुयार (४०, रा. बेलज) या महिलेला सर्पदंश झाल्याने दाखल करण्यात आले होते. मात्र शिला भुयार यांचा उपचारदरम्यान सोमवारी सायकांळी मृत्यू झाला. मृत्यूची माहिती पोलीसांना देणे अनिवार्य आहे. मात्र तरिसुध्दा आयसीयूमधील कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणाचा कळस गाठून शीला यांच्या मृत्यूचा मेमो मंगळवारी सकाळी १०.१० मिनिटांनी पोलिसांना दिला आहे. सोमवारी सायकांळपासून शीला यांचा मृतदेह रुग्णालयाच्या शवविच्छेदनगृहात पडून होता. मंगळवारी सकाळी पोलिसांना उशिरा मेमो मिळाल्याने मृताच्या नातेवाईकांनी पोलिसांवरच रोष व्यक्त केला. त्यामुळे शवविच्छेदन करण्याच्या प्रक्रियेला उशीर लागला आहे. मेमो पोलिसांपर्यंत पोहचविण्यात उशीर झाल्याने मृतांच्या नातेवाईकांना शीला यांचे पार्थीव ताब्यात घेण्याकरिता उशीर झाला आहे. याकडे इर्विनची प्रशासकीय यंत्रणा दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे रुग्णांचे नातेवाईक व पोलीस यंत्रणा इर्विनच्या कारभाराने त्रस्त झाल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)