इर्विनच्या आयसीयूत वर्षभरात ३८४ गंभीर रुग्णांवर झाले उपचार
By उज्वल भालेकर | Published: May 5, 2024 08:16 PM2024-05-05T20:16:20+5:302024-05-05T20:20:48+5:30
काही गंभीर रुग्णांना प्राणही गमवावे लागल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.
अमरावती: जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) येथे सहा बेडचे आयसीयू विभाग असून, येथे १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या एक वर्षाच्या कालावधीमध्ये ३८४ गंभीर रुग्णांनी उपचार घेतले आहेत. यामध्ये सर्वाधिक १९६ पुरुष रुग्णांची संख्या आहे. आयसीयूमध्ये भरती असलेल्या अनेक रुग्णांना वाचविण्यात रुग्णालय प्रशासनाला यश आले असून, मात्र काही गंभीर रुग्णांना प्राणही गमवावे लागल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.
जिल्हा सामान्य रुग्णालय हे एकमेव शासकीय रुग्णालय आहे, ज्या ठिकाणी आयसीयूची सुविधा आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील उपजिल्हा रुग्णालय तसेच ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या अनेक गंभीर रुग्णांना इर्विन रुग्णालयातच भरती केले जाते. यामध्ये सर्पदंश झालेले, विषारी औषध प्राशन केलेले, अपघातात गंभीर झालेल्या रुग्णांना येथे भरती केले जाते.
त्याचबरोबर जिल्हा स्त्री-रुग्णालय या ठिकाणीदेखील आयसीयू सुविधा नसल्याने प्रसूतीदरम्यान प्रकृती गंभीर झालेल्या मातांनादेखील याच आयसीयू विभागात भरती करण्यात येते. जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून प्राप्त आकडेवारीनुसार आयसीयू विभागात २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये ३८४ रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यामध्ये १९६ पुरुषांची, तर १८८ महिला रुग्णांची संख्या आहे. भरती झालेल्या अनेक गंभीर रुग्णांचे प्राण वाचविण्यात रुग्णालय प्रशासनाला यशदेखील आले आहे.