इर्विनचा मेळघाट सेल कुचकामी
By Admin | Published: January 31, 2015 11:12 PM2015-01-31T23:12:09+5:302015-01-31T23:12:09+5:30
इर्विनमधील दाखल झालेल्या चिखलदरा येथील आदिवासी रुग्णांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला होता. मृतदेह गावी नेण्यासाठी नातेवाईकांनी पायपीट केल्यावर तब्बल दोन तासांनी मृतदेह गावी नेला.
अमरावती : इर्विनमधील दाखल झालेल्या चिखलदरा येथील आदिवासी रुग्णांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला होता. मृतदेह गावी नेण्यासाठी नातेवाईकांनी पायपीट केल्यावर तब्बल दोन तासांनी मृतदेह गावी नेला. त्यामुळे आदिवासी रुग्णांना आरोग्य सेवेबाबत मेळघाट सेलमधील कर्मचारी हलगर्जीपणा करीत असल्याचे आढळून आले आहे.
आदिवासी नागरिकांना आरोग्य सेवा देण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात मेळघाट सेलची स्थापन करण्यात आली आहे. त्याकरिता मेळघाट सेलमध्ये ६ कर्मचारी सज्ज आहेत. हे कर्मचारी दोन पाळीत काम करीत असून अनेकदा मेळघाट सेलच्या कक्षात एकही कर्मचारी उपस्थित नसल्याचे आढळून आले आहे. आदिवासी नागरिकांची भाषा समजावी याकरिता कोरकू समाजातील काही जणांची मेळघाट सेलमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र वेळेवरच कर्मचारी उपस्थित नसल्याने रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे.
चिखलदरा येथील रहिवासी रामलीला संजू दहीकर (३२, रा. गिरगुटी) या महिलेल्या ७५ टक्के भाजलेल्या अवस्थेत दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. इर्विनमध्ये मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आल्यावर तब्बल दोन तास मृतदेह शवविच्छेदनगृहात पडलेला होता. मात्र मृताच्या नातेवाईकांना मदत करण्यासाठी तेथे कोणीही उपस्थित नव्हते. अखेर काही रुग्णवाहिका चालकांनी सामाजिक बांधिलकी दर्शवून त्या आदिवासी नागरिकांना सहकार्य केले. मृतदेह गावी नेण्यासाठी नातेवाईकांजवळ पैसे सुध्दा नव्हते, त्यामुळे काही जणांनी जिल्हा शल्य चिकित्सक अरुण राऊत यांच्याशी मोबाईलवर संपर्क केला. त्यावेळी रुग्णवाहिकेची सोय करण्यात आली. आदिवासींना आरोग्य सुविधा पुरविण्यात मेळघाट सेलची अनास्था दिसून येत आहे. गोरगरीब आदिवासीसाठी शासनाकडून सुविधा देण्यात येते मात्र इर्विनच्या मेळघाट सेलमध्ये कर्मचारी कामात हलगर्जीपणा करीत असल्याचे आढळून येत आहे. (प्रतिनिधी)