‘इर्विन’मध्ये रक्त गोठलेलेच...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 11:16 PM2018-04-15T23:16:17+5:302018-04-15T23:16:17+5:30
जिल्ह्यातील रूग्णसेवेचा डोलारा सांभाळणाऱ्या जिल्हा सामान्य रूग्णालयात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. ‘इर्विन’मध्ये उपचार घेत असलेल्या रूग्णांना वेळीच रक्त मिळत नसल्याने त्यांच्या शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या जात आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यातील रूग्णसेवेचा डोलारा सांभाळणाऱ्या जिल्हा सामान्य रूग्णालयात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. ‘इर्विन’मध्ये उपचार घेत असलेल्या रूग्णांना वेळीच रक्त मिळत नसल्याने त्यांच्या शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या जात आहेत. याचा सर्वाधिक फटका गरीब, सामान्य रूग्णांना बसत आहे.
जिल्हा सामान्य रूग्णालय, जिल्हा स्त्री रूग्णालय, विभागीय संदर्भ सेवा रूग्णालयासह उपजिल्हा रूग्णालय, तालुका ग्रामीण रूग्णालय येथील रूग्णांना रक्त हवे असल्यास ‘इर्विन’ मध्ये धाव घ्यावी लागते. हल्ली उन्हाळ्यामुळे रक्तपेढीत रक्तसाठा कमी असून मागणी वाढली आहे. ग्रामीण भागातून ‘इर्विन’मध्ये दरदिवसाला शेकडो रूग्ण उपचारासाठी दाखल होतात. बरेचदा रूग्णांवर शस्त्रक्रियेसाठी आवश्यक रक्तपुरवठा होत नसल्याने अशा रूग्णावर चार ते पाच दिवसांनी रक्त पुरवठा झाल्यानंतर शस्त्रक्रिया करण्याचा प्रसंग वैद्यकीय यंत्रणेवर आला आहे. त्यामुळे रूग्णांचे हाल होत आहे. ‘इर्विन’मध्ये दरदिवशी २० ते २५ रक्ताच्या पिशव्या लागतात. मात्र, शाळा व महाविद्यालयांना एप्रिल ते जूनपर्यंत सुट्या असल्यामुळे रक्तदान शिबिरांचे आयोजन मंदावरणार आहे. शासकीय रूग्णालयांना रक्तासाठी ‘इर्विन’वर अवलंबून रहावे लागते. परंतु, त्यातुलनेत रक्तदानासाठी नागरिक समोर येत नाही. एप्रिलमध्येच ‘इर्विन’ची रक्तपेढी गोठली असून, मे महिन्यात याची तीव्रता अधिक जाणवेल, असे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
खासगी रक्तपेढीत रक्ताची वानवा
शासकीय रूग्णालयात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असताना खासगी रक्तपेढींचीसुद्धा हीच स्थिती आहे. येथील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाची रक्तपेढी, बालाजी ब्लड बँक, डॉ. हेडगेवार रक्तपेढी, बडनेरा येथील संत गाडगेबाबा रक्तपेढी व अचलपूर, वरूड आदी ठिकाणच्या खासगी रक्तपेढीत रक्ताची वानवा असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी
सध्या रूग्णांना हवे तेवढे रक्त मिळणे कठीण झाले आहे. उन्हाळ्याच्या सुटीत रक्तदान शिबिरांना अल्प प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे रक्ताच्या बाटल्या कमी उपलब्ध होत आहे. रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशाप्रसंगी रक्तदात्यांनी पुढे यावे, असे आवाहन वैद्यकीय यंत्रणांनी केले आहे.
उन्हाळ्यामुळे रक्तदान शिबिरांचे आयोजन मंदावले आहे. त्यामुळे रक्ताचा तुटवडा जाणवत असून, सामाजिक संघटना, राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिरांचे आयोजन करून रूग्णसेवेत सहकार्य करावे.
- श्यामसुंदर निकम,
शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रूग्णालय