’इर्विनच्या हलगर्जीपणामुळे चिमुकलीला ‘स्वाईन फ्लू’
By admin | Published: April 13, 2017 12:06 AM2017-04-13T00:06:47+5:302017-04-13T00:06:47+5:30
‘स्वाईन फ्लू’ संशयित मातेजवळ स्तनपानासाठी आणल्या जाणाऱ्या अवघ्या २३ दिवसांच्या चिमुरडीला ‘स्वाईन फ्लू’ची बाधा झाली आहे.
वॉर्ड क्र.९ मधील प्रकार : संशयित मातेकडून वारंवार स्तनपान
अमरावती : ‘स्वाईन फ्लू’ संशयित मातेजवळ स्तनपानासाठी आणल्या जाणाऱ्या अवघ्या २३ दिवसांच्या चिमुरडीला ‘स्वाईन फ्लू’ची बाधा झाली आहे. तिचे ‘स्वॅब’ पॉझिटीव्ह आले असून झाल्या प्रकारासाठी इर्विन रूग्णालय प्रशासनाचा हलगर्जीपणाच कारणीभूत असल्याचा सूर उमटत आहे.
सिद्धार्थनगरातील २४ वर्षीय महिलेला ‘स्वाईन फ्लू’ संशयित म्हणूून जिल्हा सामान्य रूग्णालयातील वॉर्ड क्र.९ मध्ये दाखल करण्यात आले आहे. या महिलेच्या अवघ्या २३ दिवसांच्या चिमुकलीलाही सर्दी-खोकल्याची बाधा झाल्याने तिच्यावर सुद्धा याच रूग्णालयात वॉर्ड क्र. ५ मध्ये उपचार सुरू आहेत. मायलेकी एकाच रूग्णालयात असल्याने चिमुरडीला तिचे नातलग वारंवार स्तनपानासाठी मातेजवळ आणत होते. यातूनच तिला स्वाईन फ्लूच्या विषाणुंचा संसर्ग झाला आहे. रूग्णालय प्रशासनाने असे न करण्याबाबत नातलगांना व रूग्ण महिलेला बजावल्यानंतरही त्यांनी हा प्रकार सुरूच ठेवल्याचे रूग्णालय प्रशासनाचे म्हणणे असले तरी रूग्णालय प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आणि हलगर्जीपणामुळेच २३ दिवसांच्या चिमुरडीला या भयंकर रोगाची बाधा झाली आहे.प्रतिबंधात्मक उपाय हाच पर्याय
अमरावती : शहरासह जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा प्रसार झपाट्याने होतोय. या रोगामुळे आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे. ‘स्वाईन फ्लू’ च्या रूग्णांसाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात ९ क्रमाकांचा विशेष वॉर्ड असून या रुग्णांवर तेथे उपचार केले जातात. या वॉर्डात आतापर्यंत १७ संशयितांवर प्रतिबंधात्मक उपचार करण्यात आले आहेत. पैकी चौघांचे ‘स्वॅब’ पॉझिटीव्ह आले आहेत. हा संसर्गजन्य आजार हवेच्या माध्यमातून झपाट्याने पसरत असल्यामुळे यावर प्रतिबंधात्मक उपाय हाच एकमेव पर्याय आहे. सद्यस्थितीत या वॉर्डात दोन पॉझिटीव्ह रूग्णांवर उपचार सुरु असून आता त्यात २३ दिवसांच्या या चिमुकलीचीही भर पडली आहे. तिला वॉर्ड क्रमांक ९ मधील विषाणुंमुळेच ‘स्वाईन फ्लू’ची बाधा झाली आहे.
आई आणि चिमुरडी एकाच रूग्णालयात दाखल असल्याने आपल्या नवजात बाळाविषयी मातेला ओढ वाटणे स्वाभाविक होते. तिच्या आग्रहास्तव नातलग वॉर्ड क्र. ५ मधून चिमुरडीला स्तनपानासाठी वॉर्ड क्र. ९ मध्ये आणत असत. वॉर्ड क्र. ९ या स्वाईन फ्लू बाधितांच्या कक्षात एका पॉझिटीव्ह महिलेसह अन्य संशयित रूग्ण देखील दाखल असल्याने हवेतील संसर्गातून चिमुरडीला स्वाईन फ्लूची बाधा झाली. सद्यस्थितीत चिमुरडीच्या आईचा ‘स्वॅब’ अहवाल निगेटिव्ह असला तरी बिचाऱ्या निष्पाप चिमुरडीचा ‘स्वॅब’मात्र पॉझिटीव्ह आला आहे. नातलगांनी रूग्णालय प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याने हा गंभीर प्रकार घडला आहे.
परिचारिकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष
स्वाईन फ्लूच्या वॉर्डात बाळाला आणू नका, अशा सूचना परिचारिकांनी अनेकदा नातेवाईकांना दिल्याचे येथील परिचारिकांनी सांगितले. नातलग ऐकत नसल्याने मायलेकंीना या वॉर्डातील एका विशेष खोलीत ठेवण्यात आले होते, हे विशेष.
रूग्णालय प्रशासन कठोर का नाही?
‘स्वाईन फ्लू’ हा गंभीर आजार आहे. याबाबत काळजी घेण्याची जबाबदारी सर्वस्वी ‘इर्विन’ची आहे. रूग्णांना रोगाचे गांभीर्य कळत नसले तरी रूग्णांना संभाव्य परिणामांबद्दल माहिती देण्याची जबाबदारी रूग्णालयाचीच आहे.